Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/परभणीत पित्याचा खून करणार्‍या मुलास जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल





परभणी ➡️ दोन वर्षापुर्वी परभणी शहरातील विकास नगरात मुलानेच पित्याचा खून केल्याची घटना घडली होती. परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने या खून खटल्याचा निकाल आज सोमवारी दिला असून वडिलांचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवत मुलाला जन्मठेप व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए.शेख यांनी हा निर्णय दिला आहे. (vnsnews-24, crime, parbhani ) 





याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरात ही घटना दि.2 मे 2020 रोजी घडल्यानंतर नसीर खान युसुफ खान पठाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात म्हटले होते की, दि.2 मे 2020 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्याचे वडील घराच्या पाठीमागे बसून काकडी कापत होते. तो त्यांना भेटून खोलीमध्ये गेला. नंतर नमाज पठण करुन परत घरी आल्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्याची सावत्र बहीण फरजाना व आरोपी मैनोद्दीन याची पत्नी यास्मिन अशा दोघें ओरडत घराबाहेर आल्याने नसीर खान व त्याची पत्नी नसरीन, भाऊ हसन व त्याची पत्नी हसीना असे सगळेजण घराबाहेर आले व बहीण फरजाना हिला काय झाले? असे विचारले असता त्या दोघींनी सांगितले की, मैनोद्दिन याने वडिलांसोबत भांडण करुन त्यांना चाकूने मारले आहे. असे म्हणताच सर्व जण घराच्या आतील खोलीजवळ गेले असता मैनोदिन हा त्याच्या हातात चाकू घेवून उभा होता. 





नसीनले त्याला काय केलेस? असे विचारले असता तो म्हणाला, तुम्ही कुणीही माझ्या जवळ येवू नका नाहीतर चाकून मारतो. मी आताच वडिलांना चाकूने मारले आहे, असे म्हणून मैनोद्दीनने घरात जावून चाकू किचनमध्ये ठेवला व त्याच्या खोलीत निघून गेला. त्यानंतर सर्वजण वडिलाच्या खोलीमध्ये गेले असता युसुफ खान पठाण हे पलंगाच्या खाली पालथ्या स्थितीत जमिनीवर पडलेले होते. त्यांच्या अंगावरील कपडे रक्ताने भरलेले होते. ते बोलण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांना बोलता येत नव्हते, नंतर सरकारी दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले, अशा प्रकारची फिर्याद दिली होती. 






त्यावरून कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 302, 506 भादंविनुसार आरोपी मैनोद्दीन पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी केला. तपासासाठी त्यांना पोलीस हवालदार विठ्ठल कुकडे यांनी मदत केली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील वैद्यकीय अधिकारी, मयताचा मुलगा व सून यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. शेख यांनी सर्व साक्ष पुराव्याचे अवलोकन करून दि. 26 डिसेंबर 2022 रोजी आरोपी मैनोदिन युसुफखान पठाण (रा. विकास नगर परभणी) यास कलम 302 भादविनुसार जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. 






या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. नितीन खळीकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कपिल शेळके, पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण, शंभुदेव कातकडे, फोर्ट पैरवी अंंमलदार प्रमोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले. (vnsnews-24, crime, parbhani ) 









Post a Comment

0 Comments