Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

उद्याच्या देशव्यापी संपात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आवाहन





परभणी
 ➡️ दिल्ली येथे पंजाब, हरियाणासह देशभरातील 15 राज्यातील शेतकर्‍यांनी व 500 पेक्षा जास्त संघटनांनी पुकारलेल्या दि.8 डिसेंबर रोजीच्या भारत बंद आदोलनास परभणी जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संंघटना, शेतकरी संघर्ष समिती यासह प्रमुख राजकीय पक्ष व विविध संघटना पाठिबा देवून रस्त्यावर उतरणार आहेत. सर्व नागरिकांनी  मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू जाधव, आ.सुरेश वरपूडकर यांनी केले आहे.

या आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, दादासाहेब टेंगसे, नगरसेवक सचिन आंबिलवादे, रवि सोनकांबळे, शेतकरी संघर्ष समितीचे कॉ.राजन क्षीरसागर, माणिक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. परभणी जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती या बरोबर सर्व प्रमुख बाजारपेठ बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकरी व कार्यकर्ते विविध ठिकाणी रास्तारोको करणार आहेत. या बंदला परभणी जिल्हयातील भाजपाविरोधी सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी पाठींबा दिला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. दि 26 नोव्हेंबरपासून 15 राज्यातील लाखो शेतकरी दिल्ली येथे सर्व प्रकारच्या दबावाला झुगारून आंदोलन करीत आहेत. 

या संदर्भात कृषिमंत्री यांच्यासोबत झालेल्या पाच वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. भाजपा सरकार अडेलतट्टूपणा चालवून शेतकर्‍यांच्या न्याय्य अधिकारास नकार देत आहे. शेती हा विषय राज्याच्या अख्यात्यारीत असताना कार्पोरेट हितसंबंध पुढे रेटण्यासाठी हुकुमशाहीचा अवलंब करीत आहे. केंद्र शासनाने राज्यसभेत बहुमत नसताना हुकुमशाहीने केलेले तीन कायदे तात्काळ रद्द करावेत. 

शेतकर्‍यांना आपल्या शेतमालाची किमान आधारभूत किंमत मिळण्याचा अधिकारच हिरावून घेणारे हे कायदे आहेत.  शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020, अत्यावश्यक वस्तू कायदा 2028 आणि प्रस्तावित वीज कायदा शेतकर्‍यांवर गुलामगिरी लादणारे आहेत. याचबरोबर शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी शेतमालास किमान आधारभूत किंमत मिळणारा कायदा करण्यासाठी तात्काळ संसदेचे अधिवेशन बोलाविण्यात यावे या मागण्या बंदमध्ये करण्यात येत आहेत. 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 500 पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या संघटना एकत्र येवून ऐतिहासिक लढा देत आहेत. आत्महत्यांच्या गर्तेतून शेतकरी रणभूमीवर उतरला आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती यासह विविध पक्ष संघटना यांनी दि.8 डिसेंबर रोजीच्या भारत बंदमध्ये जनतेने सहभागी नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments