Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

आजपासून सुरु होणार धुळे जिल्ह्यातील 248 शाळा





धुळे ➡️ जिल्ह्यात तब्बल 9 महिन्यांच्या प्रतिक्षेत नंतर सोमवार पासून 248 शाळांची घंटा वाजणार आहे. प्राथमिक टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात 21 हजार 149 पालकांनी संमतीपत्र दिले आहे. या संबंधीचा अहवाल शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. कमी लोकवस्ती असलेल्या शाळा सुरु करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांनी दिली.

देशात कोरोना लॉकडाऊनच्या काळात उद्योग-व्यवसायांबरोबरच शाळा, महाविद्यालयेदेखील बंद करण्यात आली. गेल्या 9 महिन्यांपासून कोरोनाचे संकट कायम आहे. शासनाने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात शाळा सुरु कराव्यात अशी सूचना केली होती. परंतु कोरोनाचा प्रार्दुभाव आणि पालकांची संमती यामुळे धुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यास 15 दिवसांचा उशीर झाला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना लक्षात घेत 7 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येत आहेत. या काळात पूर्वतयारी म्हणून शाळांच्या निर्जंतुकीकरणासह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या सूचनांचे पालन करुन जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील 421 शाळांपैकी पहिल्या टप्प्यात 248 शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. या शाळांमधील 39 हजार 688 विद्यार्थी अध्यापनासाठी शाळेत उपस्थित राहू शकतात. यापैकी 21 हजार 149 पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंबंधीचे संमती पत्र शिक्षण विभागाकडे सोपविले आहे. या विद्यार्थ्यांसाठी 2 हजार 199 शिक्षकांपैकी 226 शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून सुरु होणाऱया या शाळा 05 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील आहेत. या गावांमध्ये गेल्या 15 दिवसांत एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला नाही याचीदेखिल माहिती घेण्यात आली आहे. सोमवारपासून धुळे तालुक्यातील 71 शाळांमधील 6 हजार 319 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिले आहे. साक्री तालुक्यातील 69 शाळांमधील 2 हजार 999, शिरपूर तालुक्यातील 48 शाळांमधील 9 हजार 427 विद्यार्थ्यांच्या पालकांनी तर शिंदखेडा तालुक्यातील 60 शाळांमधील 2 हजार 404 पालकांनी संमतीपत्र सादर केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांनी दिली.




Post a Comment

0 Comments