Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणीत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात होणार मिशन 100 डेज मोहीम





परभणी ➡️ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वप्रथम वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) प्राप्त करणे आवश्यक आहे. यासाठी परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) मिळण्यासाठी मिशन 100 डेज मोहीम कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.




यामध्ये प्राधान्याने जिल्हाभरातील संभाव्य दिव्यांगांचे वस्तुनिष्ठ पूर्ण तपासणी करून आरोग्य विभागामार्फत तालुका निहाय शिबिरांच्या माध्यमातून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक पातळीवरील ऑनलाईन नोंदणी करणे क्रमप्राप्त असणार आहे. परभणी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत आशाताईंच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे.



यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामसेवक यांनी संवेदनशीलपणे लक्ष घालून ज्या आशाताईंनी आपल्या गावामध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण केले आहे. त्यांच्याशी संपर्क साधून गावातील संभाव्य दिव्यांगांची वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) साठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. 



नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व संगणक ऑपरेटर या यंत्रणेचा वापर करून आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य दिव्यंगांची https//swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यानंतर दिनांक 1 एप्रिल 2023 पासून परभणी जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय मार्फत तालुका निहाय दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) वाटप करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.



तसेच ज्या दिव्यांगांकडे युडीआयडी कार्ड नाही त्यांनी वरील प्रमाणे संकेतस्थळावर माहिती भरून जवळच्या युडीआयडी शिबिरामध्ये जाऊन  आपले युडीआयडी कार्ड काढून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आणि समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.





Post a Comment

0 Comments