Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ जिवलग मित्र कोणत्याही औषधापेक्षा श्रेष्ठ असतात - माजी प्राचार्य डॉ.रावसाहेबजी शेंदारकर





नांदेड ➡️ आयुष्यात कोणत्याही औषधांपेक्षा माणसाचे असणारे जिवलग मित्र श्रेष्ठ असतात.विकासातील कोणत्याही अडचणी तेच दूर करू शकतात; म्हणून माणसाने चांगले मित्र आयुष्यामध्ये कमवावेत; असे प्रतिपादन श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी केले. (vnsnews-24, education, nanded ) 



श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयाच्या विशेष वार्षिक शिबिराच्या निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राचार्य शेंदारकर बोलत होते. या समारंभ कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.यशवंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांचीही यावेळी उपस्थिती होती.




आपल्या अध्यक्षीय मनोगतात पुढे डॉ.शेंदारकर असे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी देशसेवा करणे ही अभिमानाची बाब असते. राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे तरुणांवर संस्कार करत असतात. भारतातील तरुणाई पुन्हा या देशाला सोने की चिडिया करेल; असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.




कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री.नरेंद्र चव्हाण यांनी सुद्धा स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी तरुणांचे मनोबल उंचावेल असेच मार्गदर्शन केले. स्पर्धेत टिकायचे असेल तर मन मजबूत असणे गरजेचे असते. लोकशाहीत मतदान महत्त्वाचे आहे. निर्मळ मनाने मतदान करा.देशाचे भवितव्य घडवणारा उमेदवार निवडून द्या. विचारांचे प्रदूषण, नाकर्तेपणा जातीत लपविले जातात. म्हणून निकोप लोकशाहीसाठी मानवतावादी भूमिकेतून तरुणांनी मतदान केलं पाहिजे. जे दुसऱ्यांच्या मार्गातले दगड उचलतात; त्यांचेच पुढे पुतळे होतात, असे प्रतिपादन नरेंद्र चव्हाण यांनी केले.



निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीरा फड यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगत डॉ.बी.आर.भोसले यांनी मांडले तर आभार डॉ.दिगंबर भोसले यांनी मानले. या कार्यक्रमाला वाणिज्य व व्यवस्थापन संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील माजी संचालक डॉ.बी.एन.खंदारे उपस्थित होते.(vnsnews-24, education, nanded ) 








Post a Comment

0 Comments