Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणीत अंगणवाडीताईंसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न  






परभणी ➡️ ग्रामीण भागात आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पडणाऱ्या अंगणवाडीताईंचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडीताईंसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संक्लपनेतून आयोजित केलेली जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

   

गुरुवार दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अंगणवाडीताईंच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन परभणीतील कन्याशाळेत करण्यात आले होते. यावेळी या संवाद मेळाव्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून औरंबाद येथील लोकपर्याय स्वयंसहाय्य् संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या, मंगल खिंवसरा उपस्थित होत्या. 


त्याच बरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, लोकपर्याय स्वयंसहाय्य् संस्थेच्या सुनीता जाधव, पुर्णाच्या सीडीपीओ सुनीता वानखेडे, परभणीचे सीडीपीओ अरविंद आकात यांच्यासह पर्यवेक्षिका - अंगणवाडीताईंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


उपस्थित अंगणवाडीताईंना सविस्तर मार्गदर्शन करतांना मंगल खिंवसरा म्हणाल्या कि, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा रोष पत्करून बालविवाह पद्धती, केशवपन, जरड विवाह, भ्रूण हत्या सारख्या अनिष्ट चालीरीती बंद केल्या. स्त्री - पुरुष समानतेसाठी डॉ. बाबासाहेबांनी भारताला संविधान दिले. त्यामुळे आज महिला सक्षमपणे समाजात वावरत आहेत. इतिहासातील महापुरुषांच्या अनमोल योगदानामुळे महिला आणि समाज उभा आहे त्यामुळे ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात जिजामाता, राजमाता अहिल्याबाई, सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, फातेमा शेख, बहिणाबाई चौधरी यांच्या सारख्या थोर व्यक्तींच्या विचारांचे पारायण होणे गरजेचे असल्याचे मंगल खिंवसरा म्हणाल्या. तसेच कोरोना काळात अंगणवाडीताई बरोबर इतर सर्व यंत्रणांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि महिलांना त्यांचे अधिकार माहित असणे गरजेचे आहेत. मुलींचे शिक्षण नाही झाले तर बालविवाह होणे अटळ आहे. महिलांनी स्वतःची ओळख गुड मॅनेजर आणि होम मेकर म्हणून निर्माण करणे गरजेचे आहे तसेच अन्याय सहन न करता त्याविरुद्ध सक्षमपणे उभे राहणे आवश्यक आहे. यासाठी आत्मविश्वासाने जगणे गरजेचे आहे.पुरुषप्रधान समाजात महिलांनी माणूस म्हणून एक होऊन सन्मानाने जगले पाहिजे.


यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे बोलताना म्हणाल्या कि, आपल्या कामामध्ये खरी लक्ष्मी आहे त्यामुळे आपले काम प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. महिलांनी समाजात वावरताना आत्मविश्वास बाळगणे महत्वाचे आहे. तसे नाही केले तर आपली प्रगती होऊ शकणार नाही तसेच महिलांचे प्रश्न आणि अडचणी समाजाने नेमकेपणाने समजून घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर अंगणवाडी ताई, आशाताई या मानधन सेवेवर काम करणाऱ्या आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणात सवलत, घरकुल, विहीर अशा शासकीय योजना शासनस्तरावरून मिळाल्या पाहिजे अशी भावना व्यक्त केली.


तर उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे म्हणाल्या कि, आजच्या महिला चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर येत आहेत त्यामुळे महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवणे आणि प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदविला पाहिजे ज्यावेळी महिला उच्च शिक्षण घेतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील तेव्हा खऱ्या महिला सक्षम होतील.  


तर अध्यक्षीय समारोप करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचे अधिकारी घटनेत मांडले. त्यामुळे महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचाराने आपण चांगलं शोधायला आणि चांगले जगायला शिकले पाहिजे. माणसं जर माणसासारखी वागली तर समाजातील भेदभावाची दरी कमी होईल. तसेच सामाजिक कार्यकर्त्या, मंगल खिंवसरा यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव त्यांनी यावेळी केला. समाजात स्त्रियांचे जीवन खूप त्रासदायक आहे. मोठ्या प्रमाणात बालविवाह आणि गर्भपात केला जातो याला आळा बसला पाहिजे. विधवा मुलींना आपला मुलगा म्हणूनच सांभाळले पाहिजे स्त्रियांचा सन्मान केला तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शोभू. परभणी जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी तालुकास्तरावर कार्यशाळेंचे आयोजन करण्याचे आवाहन यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी केले.


कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि तालुका स्तरावरील बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना पुढील रुपरेषे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परभणीचे सीडीपीओ अरविंद आकात यांनी तर आभार प्रदर्शन उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी केले. सदर जिल्हास्तरीय संवाद मेल्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.




Post a Comment

0 Comments