Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत





 मुंबई  ➡️ कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली.


उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड-19 परिस्थितीची काल आढावा बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, कला संचालक राजीव मिश्रा उपस्थित होते.


सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अभिप्रायाप्रमाणे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. 



यामध्ये वीजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिविटी नसल्यामुळे अथवा स्वत: विद्यार्थी किंवा कुटुंबीय कोविडबाधित असल्यास संबंधित विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच गोंडवाना विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ व नांदेड विद्यापीठाशी संलग्नित काही भागात नेटवर्किंग सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ /महाविद्यालयाने हेल्पलाईन व्यवस्था सुरु करावी. परीक्षेची कार्यपद्धती, परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच इ. माहिती विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.

सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयाशी संबंधित वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना व कालावधी देऊन वसतिगृह बंद करण्यात यावेत. यामध्ये परदेशी विद्यार्थी व संशोधन करीत असलेले पीएचडीचे विद्यार्थी यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. स्थानिक प्राधिकरण कोविड केअर सेंटर म्हणून वसतिगृह आवश्यकता असल्यास ती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या.


विद्यापीठे तसेच महाविद्यालयांनी अद्याप लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला देऊन लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून तातडीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे. तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी 15 ते 18 या वयोगटातील असल्याने व या वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण सुरू झाले असल्याने संचालक तंत्रशिक्षण यांनी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यावी व विशेष मोहिमेद्वारे लसीकरण पूर्ण  करून  घावेत. 



तसेच संचालक कला यांनी ऑनलाईन चित्रकला परीक्षेसंदर्भात नियोजन करुन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच विद्यापीठ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची चक्राकार पद्धतीने 50 टक्के उपस्थितीचे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी केले.




Post a Comment

0 Comments