परभणी ➡️ भारतीय लष्करी सेवेत तांत्रिक विभागात कर्तव्यावर असलेल्या तांदुळवाडी येथील वीरजवान लक्ष्मण रामराव तांदळे यांचे राजस्थानात अपघाती निधन झाले. त्यांच्या मूळ गावी तांदुळवाडी येथे आज बुधवारी (दि.26) दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (vnsnews24, feature )
वीरजवान लक्ष्मण तांदळे यांचे पार्थिव सुभेदार रवींद्र पवार (औरंगाबाद) व हवालदार प्रशांत यांच्या पथकाने औरंगाबाद विमानतळावरून आज दुपारी १ वाजता गंगाखेड शहरात आणले. गंगाखेड येथील महाराणा प्रताप चौक ते तहसील कार्यालयापर्यंत माजी सैनिक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वीर जवान तांदळे यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी तसेच माजी सैनिकांच्या वतीने माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सातपुते, उपाध्यक्ष प्रल्हाद मुंडे, तालुकाध्यक्ष अशोक आईनिले यांनी मानवंदना दिली. वीरजवान लक्ष्मण तांदळे यांचे मोठे भाऊ डॉ.केशव यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
वीरजवान लक्ष्मण तांदळे यांच्या अंत्यविधीस परभणीचे खासदार संजय जाधव, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार प्रदीप शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पिंपळदरीचे सपोनि विक्रम हराळे आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी 'भारत माता की जय, वंदे मातरम्, जवान लक्ष्मण तांदळे अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.
0 Comments