💥5 व 6 नोव्हेंबरला गंगाखेड येथे जिल्हास्तरीय नोकरी मेळावा
परभणी ➡️ देशात वाढत असलेली बेरोजगारी चिंता वाढवणारी असून त्यामध्ये कोरोनाने भर घातली आहे. बेरोजगारीची सरकारी आकडेवारी सुध्दा भयानक स्वरूपाची आहे. सुशिक्षित युवकांना काम नसल्यामुळे शहरी आणि ग्रामीण तरुण निराशेच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये बेरोजगार तरुणांना कौशल्यपूर्ण नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती युवा उद्योजक सुनिल रत्नाकरराव गुट्टे यांनी दिली आहे. गंगाखेड येथील संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात येत्या 5 व 6 नोव्हेंबरला जिल्हास्तरीय नोकरी मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून आयोजित परभणी जिल्हास्तरीय नोकरी मेळाव्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शहरात शुक्रवारी (दि.28) पत्रकार परिषद घेण्यात आली. पुढे बोलताना सुनिल गुट्टे म्हणाले की, जिल्हास्तरीय नोकरी मेळाव्यात सुरक्षा रक्षक, शिपाई, क्लर्क, ड्रायव्हर, टायपिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासह आयटीआय, इंजिनिअरींग, मेडीकल, सुपरवायझर, टेलिकॉलर, डिलिव्हरी बॉय, नर्स, सोशल मिडीया, ग्राफिक डिझाईनर, व्हिडीओ एडीटर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. (vnsnews-24 |feature| parbhani )
त्यामध्ये परभणीसह पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर येथून 50 कंपन्या सहभागी होत आहेत. त्यातून जवळपास 3 हजार 500 तरुण-तरुणींना नोकरी मिळणार आहे. मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यत तब्बल 4 हजार गरजू उमेदवारांनी सहभागासाठी नावनोंदणी केली आहे. तसेच येत्या 30 ऑक्टोबरपर्यत नावनोंदणीची प्रक्रिया चालणार आहे. मेळाव्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी झाली आहे.
सीईओ डोंगरे म्हणाले की, नोकरी मेळावा तरुणांना दिलासा देणारा ठरेल. जिल्हयाच्या विकासाचा मोठा अनुशेष आहे. त्यामुळे इथला युवक सुध्दा रोजगाराच्या शोधात पुणे-मुंबईत स्थलांतरीत झाला आहे. मात्र, कोरोनाच्या लाटेत अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे हाताला काम नसलेल्या पोरांनी आपापल्या गावाची वाट धरली.
उच्चशिक्षित किंवा कला-कौशल्य असणारे हात बेरोजगारीचा शिक्का मिरवत गावखेड्यांच्या पारावर बसून आहेत. त्यांना निराशेतून बाहेर काढून आनंद देण्यासाठी आयोजित केलेला हा मेळावा निश्चित दिलासा देणारा ठरेल, अशी अपेक्षा गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी बोलताना व्यक्त केली.
यावेळी गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे, माजी नगरसेवक सचिन देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप आळनुरे, पत्रकार पिराजी कांबळे, अॅड. मिलिंद क्षीरसागर, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे उपस्थित होते.
0 Comments