Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

Lonavala to Bhimashankar Range Trek | परभणीच्या 16 गिर्यारोहकांनी पुर्ण केला लोणावळा ते भीमाशंकर रेंज ट्रेक




सह्याद्रीच्या रांगांसह अभयारण्यात केली 75 किमी पदभ्रमंती

परभणी ➡️  परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या 16 सदस्यांनी लोणावळा ते भीमाशंकर रेंज ट्रेक पुर्ण करुन नुकताच घेतला आहे. सह्याद्रीत वनविहाराला एकूण 26 ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी झाले होते. शिलेदार अ‍ॅडव्हेन्चर्स इंडिया मुंबई ग्रुपचे सागर नलवडे यांनी दिनांक 20 व 21 ऑगस्ट 2022 रोजी हा दोन दिवसांचा ट्रेक आयोजित केला होता. 



स्वराज्य ट्रेकर्स परभणीचे मार्गदर्शक प्रमुख माधवराव यादव, राजेश्वर गरुड, रणजित कारेगावकर, नानासाहेब कदम, स्वप्नील पवार, बाळासाहेब घाटोळ, गजानन पवार, बाळासाहेब काळे, अतुल शेळके, अरुण आडे, गोविंद कदम,  गणेश यादव, अतुल कदम, संतोष व्यवहारे, निलेश देशमुख, हनुमान यादव यांनी हा ट्रेक पुर्ण केला. 



शिलेदार अ‍ॅडव्हेन्चर्स इंडियाने आखून दिलेल्या मार्गावरून आणि अधिकृत ठिकाणीच वास्तव्य करण्याची अट घालण्यात आली होती. स्थानिक रोजगार वाढविण्यासाठी गिर्यारोहकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्थाही गावात करण्यात आली होती. पुण्यात पाऊस नव्हता पण पुढे भूर भूर पाऊस सुरु झाला. शुक्रवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास जेंव्हा लोणावळ्याला पोहोचलो तेंव्हा तर धुवाधार पाऊस सुरु झाला. 



सिंहगड इन्सिट्यूटच्या वसतिगृहात उतरलो व कॅन्टीनवर सर्वांनी जेवण केले. दोन तास झोपून लगेच मध्यरात्री आवराआवर करीत शनिवारी पहाटे 2 वाजता तुंगार्ली लेकमार्गे भीमाशंकरच्या वाटेला लागले. यातच धुवाधार पाऊस पडतच होता. अंधार होता म्हणून सर्वांनी हेडटॉर्च लावले. मजल दरमजल करत पुढे निघाले. वाटेत एक दुथडी भरून वाहणारा ओढा लागला. ओढ्यात सर्वांनी पाऊल टाकले. पाण्याला इतकी ओढ होती कीं, पाय पाण्यात ठरतच नव्हता. मग सर्वांनी मानवी साखळी करत तो ओढा ओलांडला. 



पहिलाच अनुभव असल्यामुळे अनेकजण खूप घाबरले होते. पण नंतरच्या दोन दिवसात इतके असे दुथडी भरून व रोरावणारे ओढे  त्यांनी मानवी साखळी करून ओलांडले की भीती थोडी कमी झाली. पुढे तर सर्वांनीच ओढे मोजायचेच सोडले. अभयारण्यात रानगवा, शेकरु, माकडे या वन्यप्राण्यांसह खेकड्यांचेही दर्शन घडले. 



लोणावळा येथील धरणाजवळील डोंगरापासून शनिवार दिनांक 20 ऑगस्टला पहाटे 2 वाजता  पदभ्रमंती  सुरू करीत सर्वजण उधेवाडी नावाच्या एका छोट्या गावात नास्टा व चहापाणी घेवून पुढे निघाले. सकाळी 7 वाजल्यापासून चालत चालत सगळेजण दुपारी दोनच्या सुमारास कुसुर गावात पोहोचले. कडाडून भूक लागलेली असल्याने सर्वांनीच वरण भातावर चांगलाच ताव मारला. 



दुपारी 3 वाजता तिसर्‍या टप्प्यात मोठ्या डोंगराच्या पाथथ्याशी असलेल्या पधारवाडी गावात संध्याकाळी 7 वाजता सर्वजण मुक्कामी पोहोचले. दुसर्या दिवशी भीमाशंकर अभयारण्यातून साधारणत: 35 किमी अंतर पायी चालून डोंगर-दर्या चढून -उतरुन रस्त्यात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या सौंंदर्याचा आनंद घेत, उंचच उंच धबधब्यांखाली न्हावून निघत सर्वजण भीमाशंकर  मंदिरात पोहोचले. 



श्रावण महिना व रविवारच्या सुटीमुळे झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेत बाहेरुनच कळसदर्शन करुन सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, कौडण्य शंकर मंदिर, गुप्त भीमाशंकर दर्शन घेत भीमा नदीच्या प्रवाहाला दोनदा क्रॉस केले. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी  शिलेदार अ‍ॅडव्हेन्चर्स इंडियाचे सागर नलवडे, मोनिश येनपुरे, वृषभ कुसनळे यांच्यासह स्वराज्य ट्रेकर्स परभणीचे माधवराव यादव, राजेश्वर गरुड आदींनी विशेष परिश्रम घेतले.






Post a Comment

0 Comments