Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ सहसंचालकांकडून जिंतूरच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी





संभाजी ब्रिगेडकडून आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाकडून कार्यवाही

जिंतूर ➡️ एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने विद्यार्थी संख्या व पूर्णवेळ प्राध्यापकांअभावी या ठिकाणच्या दोन शाखा इतरत्र हलविण्यात आल्या आहेत. याठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करून तंत्रनिकेतनला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे संभाजीनगर येथील तंत्रनिकेतन सहसंचालक उमेश नागदिवे यांनी तात्काळ महाविद्यालयास गुरुवारी भेट देऊन कामाची चौकशी करून प्राध्यापक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.(vnsnews24, feature ) 




याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर तंत्रनिकेतन महाविद्यालयाला कमी होत असलेली विद्यार्थी संख्या व पूर्णवेळ प्राचार्य प्राध्यापक मिळत नसल्याने या महाविद्यालयाला घरघर लागली आहे. तर मागील पाच वर्षापासून अनेक गैरसोयी असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थीसंख्या घटली. परिणामी तंत्रनिकेतन बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेकडून महाविद्यालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत  मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. 





या निवेदनाची तात्काळ दखल घेत सहसंचालक नागदिवे यांनी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांची चौकशी करून तात्काळ कायमस्वरूपी प्राचार्य, प्राध्यापक नियुक्त करून महाविद्यालयात पूर्णवेळ काम न करणार्‍या 10 ते 15 शिक्षक प्राध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तर महाविद्यालयात होणार्‍या गैरसोयी दूर करून विद्यार्थ्यांसाठी लवकरच बस चालू करून महाविद्यालयासाठी स्वतंत्र विद्युत पावर फिडर सुरू करण्यात येईल तसेच महाविद्यालयात होणार्‍या गैरप्रकारची चौकशी करून कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी भेटी दरम्यान दिला. 





यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.माधव दाभाडे,पत्रकार शेख अलीम,ज्ञानेश्वर रोकडे यांची उपस्थिती होती. जिंतूरचे हे वैभव वाचविण्यासाठी तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी सहसंचालक नागदिवे यांनी व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments