Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ परभणी जिल्हयात 735 वीजग्राहकांकडून 'रूफटॉप सोलर योजना' अंतर्गत 5 हजार 610 किलोवॅट क्षमतेची वीजनिर्मिती




परभणी ➡️ हरितऊर्जा निर्मितीला प्राधान्य देत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर ती महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून परभणी जिल्हयातील 735 वीज ग्राहकांकडून एकूण 5 हजार 610 किलोवॅट क्षमतेच्या वीज निर्मितीचा टप्पा गाठण्यात आला आहे. या ग्राहकांना वीजबिलांपासून मुक्त मिळाली असून ते केवळ वापर करणारेच नाही तर वीजनिर्मातेही झाले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.(vnsnews24, feature ) 






परभणी जिल्हयातील वीजग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मितीला मोठयाप्रमाणावर पसंती दर्शवली आहे. आजपर्यंत 735 वीजग्राहकांनी विविध एजन्सीच्या सहाय्याने सौरऊर्जा निर्मिती संच स्थापीत केलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक परभणी शहर उपविभागातील 531 तर गंगाखेड उपविभागातील 64, सेलू उपविभागातील 60, जिंतूर उपविभागातील 35 आणि मानवत उपविभागातील 24 वीजग्राहकांनी या योजनेला पसंती दिली आहे. 



पुर्णा उपविभागातील 8, परभणी ग्रामीण उपविभागातील 7 तर पाथरी उपविभागातील 5 वीजग्राहकांनही या योजनेचा फायदा घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना अनुदान ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येते. 





त्याचबरोबर सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना 20 टक्के अनुदान देण्यात येते.



सौरऊजेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. 




यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा स्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी व ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.





सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होते. तसेच नेट मिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाते. त्यामुळे वीज ग्राहकांसाठी फायद्याची असणाऱ्या व पर्यावरणला हातभार लावणाऱ्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.







Post a Comment

0 Comments