Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  महावितरणच्या भरारी पथकांकडून नांदेड परिमंडळातील ९२ वीज चोऱ्या उघडकीस





दंडाची अनुमानीत रक्कम न भरल्यास  गुन्हे दाखल होणार

नांदेड ➡️ महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या  ११ भरारी पथकाने नांदेड परिमंडलात तीन दिवस  वीज चोरांविरूध्द राबविलेल्या धडक मोहीमेत ९२ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. संदीग्ध असलेल्या १४० वीज मिटरची तपासणी या मोहीमेत  करण्यात आली.  यामध्ये 92 वीजग्राहकांच्या वीज मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. या वीज चोरी प्रकरणी संबंधितांना अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात  येणार असून  वीज चोरीच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायदयानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. (vnsnews-24, feature, nanded )





मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयातील ११ भरारी पथकांनी नांदेड परिमंडलात परभणी व नांदेड मंडळांतर्गत दि. २४ ते २६ एप्रिल  या कालावधीत नांदेड  परिमंडलात विशेष वीज चोरी विरोधी मोहीम राबवली. यामध्ये १४० वीज मिटरची तपासणी करण्यात आली असता नांदेड मंडळात ५० तर परभणी मंडळात ४२ मिटरमध्ये वीज चोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले. संबंधित वीज चोरांना अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची बिले देण्यात येणार आहेत.  वीज चोरीच्या अनुमानित वीज बिल दंडाची रक्कमेचा भरणा न केल्यास संबंधितांवर विद्युत कायदयानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो.  तसेच कलम १३५ मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व  कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. 

     




वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.  अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.




आगामी काळात वीज चोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहिम राबविण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल व छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे  सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश  गोंदावले तसेच प्रभारी कार्यकारी संचालक सुरक्षा व अंमलबजावणी सुमीत कुमार यांनी दिले असून   मराठवाडयात  सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उप संचालक सतीश कापडणी  यांनी सदर वीज चोरीची मोहीम  पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. VNS-PBN-SAT/







Post a Comment

0 Comments