Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती रुजण्यास मदत - जिल्हाधिकारी आंचल गोयल





✴️ वाचनामुळे व्यक्ति मत्त्वाचा सर्वांगीण विकास  - जेष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव

✴️ 'परभणी ग्रंथोत्सव 2022' चे थाटात उद्घाटन

परभणी ➡️ वाचनातून ज्ञानवृद्धी होवून जाणिवा समृद्ध होतात. जगण्याचे बळ मिळते. तसेच प्रयोजनही कळते. ग्रंथ वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केले. तसेच ग्रंथोत्सवामुळे विद्यार्थी आणि वाचकांमध्ये ग्रंथवाचनाची आवड निर्माण होईल. त्यामुळे वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथोत्सवाची मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांनी आज येथे व्यक्त केली. 





राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे, जिल्हा ग्रंथालय कार्यालय व ग्रंथालय संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे आयोजित दोन दिवसीय 'परभणी ग्रंथोत्सव 2022'चे उद्घाटन जेष्ठ कवी प्रा. भालेराव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी गोयल होत्या.





सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्करराव पिंपळकर, प्रकाशन प्रतिनिधी केशव बा. वसेकर, कथाकार राजेंद्र गहाळ, कवी डॉ. विठ्ठल घुले यावेळी उपस्थित होते.





वाचन आणि संस्कृती या शब्दांची फोड करून जेष्ठ कवी प्रा. भालेराव यांनी नवीन पिढीमध्ये पुस्तके वाचनाची गोडी लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाचन संस्कृतीचे घटक, रंग, मुद्रणयंत्राचा शोध, भारतीय मुद्रणकलेबाबत वाचनप्रेमींना सविस्तर माहिती त्यांनी सांगितली. वाचनाचा उपयोग आणि वाचकांच्या जीवनातील वाचनाची फलश्रुती यावर प्रकाश टाकताना शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांच्यापासून महात्मा गांधी, ज्ञानकोषकार, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह इतर साहित्यिकांचे ग्रंथांबाबतचे विचार त्यांनी मांडले.






वाचनाने ज्ञानात भर पडते, आत्मविश्वास वाढतो. जाणिवा जागृत होऊन त्या विकसित होतात. भावना प्रगल्भ होतात आणि त्यांचे विरेचन झाले म्हणजे वाचकाचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होते, तो भावश्रीमंत होतो. अशा व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते, असे प्रा. भालेराव यांनी सांगितले. तसेच ग्रंथामुळे जग बदलते, जग व युग बदलण्याची आणि घडविण्याची क्षमता ही या ग्रंथांमध्ये आहे, असे ते यावेळी म्हणाले.





बालकांचे आई -वडिलांशी ज्याप्रमाणे निखळ नाते जुळते, तसेच नाते प्रत्येकाने ग्रंथांशी जोडावे. समाजात वाचन चळवळ वाढावी, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले. तसेच ग्रंथ वाचनाविषयीचे स्वतःचे बालपणीचे अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. 





मुलांमध्ये वाचनाची आवड ही बालपणापासूनच रुजायला हवी. मनाच्या एकाग्रतेसाठी अवांतर वाचन महत्त्वाचे आहे. सध्या सुधा मूर्ती यांचे थ्री थाऊजंट स्टिचेस वाचत असल्याचे सांगून नव्या पिढीचा ई- गँझेट वापरावर जास्त भर असून गँझेटपेक्षा नवीन पुस्तके विकत आणून वाचण्याचा आनंद वेगळा असतो, असे जिल्हाधिकारी गोयल यावेळी म्हणाल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येकाने ग्रंथवाचनातून आपल्या जिल्ह्याचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 






दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धींगत करणे हा  ग्रंथोत्सव आयोजनामागचा हेतू आहे. नव्या पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रंथांकडे वळविणे आवश्यक आहे. ग्रंथ जीवनाचे अविभाज्य अंग असून सर्वांनी अवांतर वाचन करावे, असे आवाहन सहायक ग्रंथालय संचालक हुसे यांनी केले.






कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी कातकडे यांनी केले, कल्याण वसेकर यांनी आभार मानले. वाचन चळवळ रूजविण्यासाठी सायकलवारी करणाऱ्या विनोद शेंडगे यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 



🏵ग्रंथ प्रदर्शन व विक्री दालनांचे उद्घाटन 

‘परभणी ग्रंथोत्सव 2022’निमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनी व विक्री दालनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झाले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या 12 प्रकाशनांच्या दालनांमध्ये विविध विषयांवरील ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध असून उद्या मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी, ग्रंथपाल,  वाचनप्रेमी तसेच केंद्रीय विद्यालय, श्री. छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.





🏵 ग्रंथदिंडी

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले. ग्रंथदिंडीला श्री. छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही दिंडी जिल्हाधिकारी कार्यालय-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - वसंतराव नाईक पुतळामार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात पोहचली. 








Post a Comment

0 Comments