Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यातील 632 बड्या थकबाकीदारांना महावितरणचा दणका





👉 176 मीटर जप्त करत केला कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत 

👉 170 कोटींची थकबाकी भरा अन्यथा अंधाराला सामोरे जा, महावितरणचा गंभीर इशारा  

परभणी ➡️ महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असतानाही वीजग्राहकांना त्रास होवू नये म्हणून अखंडीत वीजपुरवठयासाठी महावितरण महागडया दराने वीज खरेदी करत आहे. मात्र अशावेळीही वारंवार सुचना देवूनही थकबाकी न भरणाऱ्या जिल्ह्यातील 632 बडया थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडीत करण्याची दबंग कारवाई महावितरणने केली आहे. ही कारवाई पुढेही उग्ररूप धारण करणार असून थकबाकीदार कोणीही असो त्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक कारवाई करण्याचे निर्देश औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी दिले आहेत.




वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पुर्ण थकबाकी भरल्याशिवाय पुर्ववत न करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या ग्राहकांनी चोरून वीज वापरल्यास अथवा शेजाऱ्याकडून वीजपुरवठा घेतल्यास ग्राहकांवर आणि वीजपुरवठा देणाऱ्या शेजाऱ्यांवरही वीज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी त्वरीत चीजबील भरून नामुष्की टाळावी.  

प्रवीण अन्नछत्रे, अधीक्षक अभियंता, परभणी.




महावितरणने थकबाकी वसुलीसाठी मार्च महिन्यात अनेक मोहिमा राबवल्या आहेत. यामध्ये डॉ गोंदावले यांनी स्वत: हजेरी लावत हर घर दस्तक मोहीम मोठयाप्रमाणावर राबविली. त्याचबरोबर एक गाव एक दिवस उपक्रम, ग्राहक मेळावे, वीजग्राहकांच्या दारावर जावून वीजबील भरले आहे की नाही याची पडताळणी करत विविध प्रकारे जनजागृती करून वीज ग्राहकांनी वीजबील भरावे यासाठी प्रवृत्त केले. 




मात्र आजही परभणी जिल्हयातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघूदाब वर्गवारीतील 23 हजार 800 बडया थकबाकीदारांकडे 170 कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्याचे मोठे आव्हान महावितरण समोर असून त्यासाठी आता कठोर पावले उचलत धडक कारवाई सुरू केली आहे.




परभणी मंडळाच्या वतीने पन्नास हजार रूपयांच्यावर थकबाकी असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांवर धडक कारवाई करण्याचे सत्र गेल्या दोन दिवसांपासून मोठयाप्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. थकबाकी भरा अन्यथा अंधारात राहण्याची तयारी ठेवा असा सज्जड इशारा महावितरणने दिला आहे. 




परभणी शहर उपविभाग, परभणी ग्रामीण उपविभाग, पाथरी तसेच पुर्णा उपविभागाचा समावेश असलेल्या परभणी विभाग क्रमांक एक मधील 176 थकबाकीदार वीजग्राहकांचे मीटर काढून त्यांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर परभणी विभाग क्रमांक दोन मधील गंगाखेड, जिंतूर, मानवत,पालम सेलू आणि सोनपेठ उपविभागातील 456 थकबाकीदार वीजग्राहकांचे मीटर काढून त्यांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.








Post a Comment

0 Comments