Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

महिलांची 75 हजार रुपयांचे दागिने ठेवलेली पर्स अज्ञात चोरांनी पळविले




जिंतूर ➡️ तालुक्‍यातील पिंपळगाव (काजळे) येथील महिला पती व मुलांसह जीवनावश्यक वस्तू व सोन्याचे दागिने घेण्यासाठी जिंतूर शहरात पोहोचली. मात्र काही अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर पाळत ठेवून 75 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना सोमवारी शहरात घडली.



पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार तालूक्यातील पिंपळगाव (काजळे) येथील आशामती कोकाटे (वय 35) ही शेतकरी महिला पती, मुलगा व मुलीसह 28 मार्च सकाळी 09 वाजता जिंतूर शहरातील बाजारपेठेत आपल्या शेतातील हळद विकण्यासाठी आली होती. हळद विक्री केल्यानंतर आशामती यांनी दुपारी एक वाजता शहरातील बुलढाणा बँकेत गहाण ठेवलेले एक तोळे सोन्याचे दागिने सोडवून घेतले. त्यानंतर त्यांनी अरुण शहाणे यांच्या सोन्याच्या दुकानातून मुलगी छाया हिच्यासाठी 5.50  ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केले. घरून 20 तोळे सोन्याचे दागिने आणलेले मिळून 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले.



त्यानंतर आशामती पती आणि मुलांसह दुपारी 02 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका रसवंतीमध्ये उसाचा रस पिण्यासाठी गेल्या. त्यानंतर एका कापडाच्या दुकानातून कपडे खरेदी करून मुलांना पैसे देण्यासाठी आले असता, त्यांच्या बॅगेत ठेवलेली पर्स गायब झाल्याचे दिसून आले. आशामती व त्यांच्या पतीने पर्स शोधण्याचा प्रयत्न केला. पण पर्स सापडली नाही. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.




Post a Comment

0 Comments