Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

वाशिमचे जिल्हा अधिकारी षन्मुगराजन एस ठरले उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी




वाशिम ➡️ जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत  18 वर्ष पुर्ण झालेल्या तरुण-तरुणींची मतदार यादीत नांव नोंदणी करणे, दुबार नांवे मतदार यादीतून वगळण्यासोबतच, मतदार याद्यांचे सुसुत्रीकरण व एकत्रीकरण यासोबतच विविध प्रकारच्या दुरुस्त्या करणे आदि. निवडणूकविषयक कामात अमरावती विभागात चांगले काम केल्याबद्दल वाशिमचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  षन्मुगराजन एस. यांची राज्य निवडणूक आयोगाने अमरावती विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणुन निवड केली.





12 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, प्र. कुलगुरु प्रा. डॉ. श्याम सिरसाठ, अभिनेता मकरंद अनासपुरे व अभिनेत्री चिन्मय सुमित यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्तवतीने आयोजित करण्यात आला. राज्यातील सहा महसूल विभागांतर्गत प्रत्येकी एक उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी निवडले गेले. यामध्ये अमरावती विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षन्मुगराजन एस. यांचा समावेश आहे.





जिल्ह्यात 147 निवडणूक साक्षरता क्लब, 93 मतदार जागृती मंच आणि 1051 चुनाव पाठशाळांची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला, रांगोळी,वक्तृत्व स्पर्धेचे व पथनाटयांचे आयोजन करुन युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम करण्यात आले. 15 जानेवारी 2021 ला विशेष संक्षि‍प्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अंतीम मतदार यादीत 4 लाख 94 हजार 168 पुरुष, 4 लाख 47 हजार 391 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदारांची संख्या होती. 5 जानेवारी 2022 रोजी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 5 लाख 4 हजार 787 पुरुष, 4 लाख 55 हजार 851 स्त्री आणि 6 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली. यामध्ये एका वर्षात 10 हजार 619 पुरुष, 8 हजार 460 स्त्री आणि 3 नव्या तृतीयपंथी मतदारांचा समावेश करण्यात आला. मतदार नोंदणी, मतदार जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.





15 जानेवारी 2021 च्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यात एकूण 21 हजार 100 दुबार मतदारांची नांवे होती. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून श्री. षन्मुगराजन यांनी सातत्याने पाठपुरावा तीनही मतदासंघात केला. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2022 अंतर्गत 1 नोव्हेंबर 2021 च्या प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीच्या दिवशी 19 हजार 577 मतदारांची नांवे मतदारयादीतून वगळण्यात आले. 1523 मतदारांचे छायाचित्र इरोनेटव्दारे अपलोड करण्यात आले. जिल्ह्यात सध्या दुबार नोंदणी झालेला मतदार प्रलंबीत नाही.अमरावती विभागामध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघाने दुबार नांवे असलेल्या मतदारांची पडताळणीची कार्यवाही पुर्ण केली आहे.





मतदार नोंदणीबाबत विविध राजकीय पक्ष, वंचित घटकांकरीता काम करणाऱ्या संस्था, माध्यम प्रतिनिधी, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासोबत वारंवार सभा घेण्यात आल्या. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. जास्तीत जास्त नव्या मतदारांनी ऑनलाईन मतदार नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत एकूण 34 हजार 901 अर्जापैकी 18 हजार 821 अर्जांची नोंद ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात आली. प्राप्त झालेल्या सर्व ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी निकाली काढण्यात आल्या.त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांची कामगि‍री विभागात सर्वोत्तम ठरली.





Post a Comment

0 Comments