Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिंतूर येथे पर्यावरणासाठी झटणाऱ्या "प्रणालीचा" ज्ञानोपासक परिवारातर्फे गौरव






🌟  पर्यावरण संवर्धन संदेशाकरिता 15 हजार किमी सायकल प्रवास 

🌟 375 दिवसांपासून महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यात जनजागृती 

जिंतूर ➡️ पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण जनजागृती आणि सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सलग 375 दिवसांपासून राज्यातील 30 जिल्ह्यात जनजागृती करणाऱ्या प्रणालीने तब्बल 15 हजार किमी सायकल प्रवास पूर्ण केल्याने प्रणाली चिकटेचा शनिवार 30 ऑक्टोबर रोजी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय मध्ये आयोजित गौरव कार्यक्रमात गौरव करण्यात आला. 


पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाच्या जनजागृतीसाठी प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही 21 वर्षीय विद्यार्थिनी महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) या गावातून प्रणालीचा सायकल प्रवास 20 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू झाला. आतापर्यंत 30 जिल्ह्यात जनजागृती करीत तिने 14 हजार 720 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. 


शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही प्रदूषणाची समस्या वाढली आहे. पाणी माती आणि हवा प्रदूषणाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. तापमान वाढीचा शेतीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई आहे, तर काही भागात वाहत्या नदीत दूषित पाणी सोडले आहे.



पर्यावरणाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. याकरिता एक संकल्प डोळ्यासमोर ठेऊन सायकल प्रवास सुरू झाला आहे. वृक्षतोड आणि प्रदूषणाने जैवविविधता नष्ट होत आहे. वाढते सिमेंटीकरण आणि वाहनांचा वापर प्रदूषणात भर घालत आहे. किमान प्रत्येकाने शक्य होईल तिथे सायकलने प्रवास केल्यास प्रदूषणाची पातळी कमी होईल. 

 - प्रणाली चिकटे, पर्यावरण प्रेमी विद्यार्थिनी


या परिस्थितीत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी प्रणालीने सायकल प्रवास सुरू केला आहे. प्रत्येक गावात ग्रामस्थांशी, विशेषतः महिलांशी चर्चा करून उपाययोजना सांगितल्या स्वच्छता, पाणी आणि शिक्षणाचे महत्त्व ती पटवून देत आहे. तिने चंद्रपूरच्या एसआरएम महाविद्यालयात 'समाजकार्य' विषयाची पदवी घेतली आहे. 'एनजीओ'त नोकरी करणे किंवा स्वतःची 'एनजीओ' उभारण्याची प्रणालीची इच्छा नाही. शेती करीत शाश्वत पर्यावरण चळवळ राबविण्यासाठी अधिक लोकांना जोडण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेरील जगाबाबत मुलींच्या मनात असलेली नकारात्मक भावना पुसण्याची गरज आहे, असे तिचे मत आहे. 


विद्यार्थी दशेत तिने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचा गौरव करण्यासाठी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयात तिचे अनुभव कथन ऐकून तिचा ज्ञानोपासक परिवारातर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीधर भोंबे, उपप्राचार्य एम एस दाभाडे यांची उपस्थिती होती. यावेळी जिंतूर रंडोनिअर्सचे व्यंकटेश भुरे, प्रमोद भालेराव, ज्ञानबा मापारी, प्रा अनिल संगवई, दुर्गेश नहातकर, शेख शाहरुख, राजाराम वैद्य, अजित गोरे, शेख अलीम, यज्ञेश मापारी, शहेजाद पठाण, प्रेम मेनकुदळे आदींच्या वतीने प्रणालीचा सन्मान करण्यात आला.







Post a Comment

0 Comments