Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

गाव विकासासाठी पंचसूत्रीचा अवलंब करावा - भास्कर पेरे पाटील 




 


परभणी ➡️ प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर त्यांनी स्वच्छ पाणी, गावची स्वच्छता, फळांच्या झाडांची लागवड, मुलांचे शिक्षण आणि वृद्धांचा सन्मान या पंचसूत्री चा अवलंब करण्याचे आवाहन आदर्श गाव पाटोदा जि औरंगाबाद येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. 




आज रविवार दि 31 ऑक्टोबर 2021 रोजी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा निमित्त व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आमचं गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्यावतीने करण्यात आले होते. 




यावेळी कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलताई विटेवर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, माजी उपाध्यक्ष भावनताई नखाते, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 




आपल्या विशिष्ट विनोदी शैलीत आणि धार्मिक दृष्टांता मधून मार्गदर्शन करताना भास्कर पेरे पाटील पुढे म्हणाले की, ग्रामपंचायतींनी लोकांच्या गरजा ओळखून काम करावे, महिलांना प्राधान्य देत आणि आपसातील हेवेदावे, गर्व सोडून गाव स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, मुबलक ऑक्सिजन साठी वृक्षांची लागवड करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात शौचालय वापरले मग आपण आजच्या काळातही शौचालयाचा नियमित वापर का करत नसल्याचा सवालही त्यांनी केला. 



जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष भावनताई नखाते मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, भास्कर पेरे पाटील यांच्यामुळे अनेक गावांना प्रेरणा मिळाली आहे, विकासाच्या कोणत्याही कामात पदाधिकारी आणि अधिकारी यांचा समन्वय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले की, कार्यशाळेतून योजनेचा ताळमेळ लागणे गरजेचे आहे. 



गावाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल नागरिकांनी उघड्यावरची हागणदारी बंद करावी, सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे आणि गावचे 100 टक्के लसीकरण करण्याचे आवाहन यावेळी टाकसाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांनी केले.






Post a Comment

0 Comments