Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

✴ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पाहणी





• काम गुणवत्तापूर्वक व विहित वेळेत करण्याच्या सूचना.
• करोडी येथील टोल प्लाझावर संपूर्ण सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश. 

औरंगाबाद ➡️ जिल्ह्यातून जाणाऱ्या 124 कि.मी. लांबीचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग-52 (जुना रा.म.211) च्या कामाच्या प्रगतीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पाहणी केली. या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरोना संसर्गाची खबरदारी घेत गुणवत्तापूर्वक व विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. 

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, प्रबंधक (तांत्रिक) महेश पाटील, शाखा अभियंता राहुल पाटील, प्राधिकृत सल्लागार भागवत म्हस्के, एल ॲण्ड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सूर्या राव, यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिली. तसेच जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कामाची गुणवत्ता राखत आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून जून अखेरीस काम पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगितले. 

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग-52 वरील करोडी येथे प्रस्तावित टोल प्लाझासाठी संपादित जागेची पाहणी करत टोल प्लाझावर वाहन धारकांसाठी स्वच्छालय, वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, फास्ट टँगसाठीची सुविधा व इतर आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर या राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद ते करोडी या 30 कि.मी. (खर्च 513 कोटी रुपये) औरंगाबाद बाह्यवळण रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील अडीअडचणी जाणून घेत त्याबाबत सविस्तर चर्चा करुन कामे त्वरीत पूर्ण करुन वाहतूक सुरू करण्याबाबत निर्देश दिले. ज्यामुळे शहरामधील बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक नवीन रस्त्याने वळविणे शक्य होईल. या चौपदरीकरणाचे काम मे.एल ॲण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत अंतिम टप्प्यात आहे. तर मुरमा ते औरंगाबाद (38.00 कि.मी.) व करोडी ते तेलवाडी (56.00 कि.मी.) असे एकूण 94 कि.मी. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री.काळे यांनी यावेळी दिली.  

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी महामार्गाद्वारे जोडल्या जाणारे जिल्हे, तालुके व गावे यांची नावे, दिशा दर्शक यांची माहिती लावण्याचे त्याचबरोबर महामार्गाच्या दुतर्फा जैवविविधतेस उपयुक्त झाडे लावण्याचे व त्याबाबतचे नियोजन आताच करण्याच्या सूचना केल्या. या महामार्गावरील वाल्मी येथे होत असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाची तसेच वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामुग्रीच्या गुणवत्तेचीही पाहणी केली. औरंगाबाद (करोडी ते शिर्डी) या 80 कि.मी. लांबीच्या रस्त्याची रुंदी 7 मीटरवरुन 10 मीटर करण्यात येणार असून त्यासाठीची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाची आवश्यकता नाही. या रुंदीकरणासाठीचा डीपीआर त्वरीत बनवून सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले. 




Post a Comment

0 Comments