Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

लॉकडाऊन लावायचे असेल तर ते एक दिवसाआड लावावा मनपा सदस्यांची जिल्हाधिकारीकडे मागणी





परभणी ➡️ कोवीड-19 लसीकरण संदर्भात मा.जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, मा.आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या उपस्थितीत परभणी शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या बैठकीचे गुरूवारी(दि.31) मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता बी.रघूनाथ सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मनपा सदस्यांनी लॉकडाऊन लावू नये, अशी शिफारश जिल्हाधिकारीकडे केली. जर लॉकडाऊन लावायचे असेल तर ते एक दिवसाआड लावावा, अशी सर्व मनपा सदस्यांनी या बैठकीत केली.

या व्यासपीठावर आमदार सुरेशराव वरपुडकर, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे,उपायुक्त प्रदीप जगताप, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नगरसचिव विकास रत्नपारखे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, शिवाजी सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये आयुक्त देविदास पवार यांनी कोविड लसीकरण संदर्भात बैठक आयोजीत केली आहे. मा.जिल्हाधिकारी यांनी काही सूचना देण्यासाठी व आपले सहकार्य आवाहन केले आहे. त्यासाठी बैठक आयोजीत करण्यात आली असल्याचे सांगितले. नगरसेवकांनी आपल्या प्रभागामध्ये लसीकरण तसेच आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी आवाहन करावे व जनजागृती करावी, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी शहरात व जिल्ह्यात जानेवारीपासून ते मार्चपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 342 रुग्ण आढऴून आले. मार्चमध्ये साडेपाच हजारपर्यंत बाधितांची संख्या गेली आहे. शहरामध्ये प्रभागातंर्गत केसेस वाढत आहेत. आरटीपीसीआर करण्यासाठी शहरात प्रभागतंर्गत पथक फिरत आहेत. 


तसेच शहरामध्ये दि. 01 एप्रिल पासून 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी आपण प्रत्येकाच्या घरी जावून नागरिकांना लस देण्याचे आवाहन करावे. कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. एक घरात एक पॉझीटीव्ह सापडला की घरातील तीन व्यक्ती पॉझीटीव्ह निघत आहेत. दुस-या टप्प्याच्या लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत आम्ही 60 वर्षावरील नागरिकांना लस दिली आहे. आता 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. इतर जिल्हापेक्षा आपल्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी आपले सहकार्य अपेक्षीत ते म्हणाले. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करावी व उपचारासाठी डॉक्टरांकडे जावे असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले. 

रुग्णालयात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध आहे. व्यापारी, फळ विक्रेते यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. याबैठकीमध्ये नगरसेवक इम्रान हुसैनी, गुलमीर खान,विकास लंगोटे, अमोल पाथरीकर यांनी लॉकडाऊन लावू नये, अशी शिफारश केली. लॉकडाऊन लावायचे असेल तर ते एक दिवसाआड लावावा, असे सर्व सदस्यांनी यावेळी म्हणाले. यावेळी नगरसेवक अमोल पाथरीकर, मंगल मुदगलकर, उषाताई झांबड यांनी आमच्या प्रभागात लसीकरण सुरू आहे. पॉझीटीव्ह सापडल्यानंतर कोविड सेंटरला व जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू ठेवावी, अशी मागणी झांबड, मुदगलकर, इम्रान हुसैनी, अमोल पाथरीकर, नाझजिन शकील पठाण यांनी केली. 


या बैठकीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक उपस्थित राहणे आवश्यक होते, असे यावेळी नगरसेवक म्हणाले. नाझजिन पठाण म्हणाल्या, माझ्या प्रभागात हॉस्पीटल सुरू केले आहे. त्यासाठी स्टॉफ द्यावी, अशी मागणी केली. त्या ठिकाणी तात्काळ पद भरती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आयुक्तांना दिल्या.माझ्या प्रभागातील इनायत नगर येथील हॉस्पीटमध्ये लसीकरण सुरू आहे. रोज 150 जणांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण करण्यासाठी केंद्र वाढवावे व खासगी रुग्णालयांना परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बुलबुले यांनी केली. या विषयावर नगरसेवक विकास लंगोटे यांनी लसीकरण बुथची नेमणुक करण्यात यावे, अशी मागणी केली. 

आमदार सुरेश वरपुडकर यांनी आजच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी आपल्या प्रभागात कोव्हीड-19 संदर्भात लसीकरण मोहिम राबवावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिमे प्रमाणे काम करावे. नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आवाहन केले. तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल उशिरा येतो तो लवकर देण्यात यावा, अशा सूचना केल्या. प्रत्येक प्रभागात कोरोनाचे रुग्ण निघत आहेत. लॉकडाऊन करून काही साध्य होत नाही. प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण निघत आहे. लॉकडाऊन पर्याय नाही. नगरसेवकांच्या मागणीनुसार एक दिवसाआड लॉकडाऊन करावा. शहरातील कोविड सेंटरवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. शहरातील खासगी रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात येत आहे. त्यावर नियंत्रणासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन अंबिलवादे यांनी केली. 


यासर्व बैठकीवर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शहरामध्ये शासनाचे कोवीड सेंटर व जिल्हा रुग्णालयात ओपीडीत कोविड रुग्ण तपासणीसाठी डॉक्टरांची नियुक्ती करणार, महानगरपालिकेस 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असे सांगितले. खासगी रुग्णालय शुल्क वाढ करीत आहे का, याची पाहणी करण्यासाठी पथक नेमण्यात येणार, आरटीपीसीआर चाचणी तपासणीची मशिन दोन ते तीन दिवसात जिल्हा रुग्णालयात येणार आहे. रोज पाच हजार तपासण्या होणार आहेत, असे ते म्हणाले. चर्चेमध्ये नगरसेवक विकास लंगोटे, नागेश सोनपसारे, मेहराज कुरेशी रितेश जैन, विनोद कदम, अ‍ॅड.मुजाहेद खान, मोईन मौलवी आदीनी सहभाग नोंदविला.




Post a Comment

0 Comments