Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

परभणी जिल्ह्यातील संचारबंदीत 5 एप्रिलपर्यंत वाढ





परभणी ➡️  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात लावण्यांत आलेली संचारबंदी दि.5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये उद्यापासून 4 एप्रिलपर्यंत बंद राहील व एसटी व खासगी बससेवा 15 एप्रिलपर्यंत बंद राहतील.

या आदेशात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज बुधवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी काढले. मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने तसेच नागरिकांची बाजारपेठ, दुकानांवर व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिक करोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात करोना संसर्ग वाढणार नाही याबाबत खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी कायम ठेवण्याचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार  जिल्ह्यात 5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शासकीय व खाजगी दवाखाने, औषधे दुकाने, वैद्यकीय कर्मचारी,  रुग्णालयातील कर्मचारी, लसीकरण केंद्र, rt-pcr चाचणी तपासणी केंद्र, वैद्यकीय आपत्काल व त्या संबंधित सेवा अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहने,  पेट्रोल पंप, गॅस वितरक कर्मचारी व त्यांची वाहने यांना सूट देण्यात आली आहे.


जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये उद्यापासून 4 एप्रिलपर्यंत बंद



परभणी ▶️जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिनांक 31 मार्च रोजी काढला आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग प्रतिबंधाशी संबंधित काम करणारे अधिकारी, कर्मचारी महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस विभाग, आरटीओ, विद्युत विभाग, पाणी टंचाई नियंत्रणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय 1 एप्रिलपासून दिनांक 4 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


एसटी व खासगी बससेवा 15 एप्रिलपर्यंत बंद



परभणी ▶️जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या व परजिल्ह्यातून येणार्‍या एसटीसह खासगी बसची वाहतुक 15 एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बुधवारी (दि. 31) काढले.

कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परभणी जिल्ह्यातून परजिल्ह्यात ये - जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होऊ नये, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतुक होऊ नये, म्हणून एसटी महामंडळाची तसेच खासगी बसमधुन होणारी सर्व प्रवाशी वाहतुक 15 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी बुधवारी दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांच्यावर राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.




Post a Comment

0 Comments