Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

कुष्ठरुग्ण शोध अभियान अंतर्गत नागरिकांनी घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घ्यावी - जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर




परभणी ➡️ जिल्ह्यात सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 2020 राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या मोहिमेत कर्मचाऱ्यांमार्फत घरातील सर्व सदस्यांची तपासणी करुन घेवून सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य‍चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, आरोग्य सेवा संचालक श्रीमती डॉ.विद्या सरपे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. निरस कालीदास, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ.सिरसुलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खंदारे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, राज्यातील कोविड-19 च्या आपातकालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झाले आहे. समाजातील सर्व क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन निदान निश्चितीनंतर औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानूसार दि.1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये सक्रीय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध अभियान 2020 हे राबविण्यात येत आहे. 

 आशा व आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कुष्ठरोगाबाबतची शारीरिक तपासणी करुन घ्यावी व मोहिमेदरम्यान घरात उपस्थित नसलेल्या सदस्यांची संपुर्ण माहिती व मोबाईल क्रमांक आरोग्य कर्मचाऱ्याकडे द्यावा जेणेकरुन त्यांना संपर्क करुन त्यांची तपासणी करणे शक्य होईल. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले. बैठकीत आरोग्य सेवा (कुष्ठरोग) संचालक श्रीमती डॉ.विद्या सरपे यांनी अभियानाबाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. 

संशयित कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर फीकट, लालसर चट्टा असणे, चट्यावरील त्वचा जाड होणे, चेहऱ्याची चकाकी अथवा तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, डोळे पुर्णपणे बंद न होणे, नाकाचे हाड बसणे, हातापायाला मुंग्या येणे, त्वचेवर थंड किंवा गरम संवेदना न जाणवने, हात व पाय बधीर होणे, हाताला व पायाला अशक्तपणा येणे, हातापायाची बोटे वाकडी होणे व जखमा होणे इत्यादी आहेत.




Post a Comment

0 Comments