Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

सेलूत घरातूनच बाप्पाला निरोप, नगर पालिका प्रशासन घरी येणार




सेलू 
➡️ सेलू शहरातील सर्वच गणेश भक्तांना आपल्या स्वतःच्या घरूनच, या वर्षी निरोप द्यावा लागणार आहे. कारण घरगुती गणेश विसर्जनाची पूर्ण जबाबदारी नगर पालिका प्रशासनाने घेतली आहे. कोरोनाची वाढते प्रमाण पाहता व विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी नगर पालिकेकडून  श्री गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे. ही माहिती शनिवार 29 ऑगस्ट रोजी शहरातील पोलीस ठाणे परिसरात आयोजित बैठकीत पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली आहे.
 

    यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंगळवार 1 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याकारणाने पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सेलू तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी, आणि गणेश भक्तांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले आहे. शहरात एकूण 26 सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पद्धतीने श्रीगणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे रस्त्यावर मूर्ती आणि नागरिक एकत्र येताना दिसत नाहीत. ग्रामीण भागात 24 गणपतीची स्थापना झालेली आहे. सेलू तालुक्यात मागील वर्षी 193 श्रीगणेशाची सार्वजनिक पद्धतीने स्थापना करण्यात आली होती. तसेच 48 गणेश मंडळ विनापरवाना स्थापना करत असतात. त्यातील सात गणेश मंडळ शहरात विनापरवाना स्थापना करत असतात. यावर्षी एकही विनापरवाना गणेश मंडळाने श्री गणेशाची स्थापना केली नाही. तसेच रस्त्यावर अथवा सार्वजनिक जागेत गणेश मूर्ती बसवली नाही. कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून, श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. तसेच वाद्य देखील वाजवता येणार नाही. एका सार्वजनिक गणपती मंडळा सोबत फक्त 04 गणेश भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. आणि घरगुती गणेश विसर्जनाची पूर्ण जबाबदारी नगर पालिका प्रशासनाकडे आहे. सर्वच गणेशमूर्तींचे विसर्जन पाथरी रस्त्यावरील बाजार समितीच्या विहिरीत सूर्यास्ताचपूर्वी करण्यात येईल येईल. त्यासाठी 05 पोलिस अधिकारी, 55 पोलिस कर्मचारी, व 20 होमगार्ड आदींची सुरक्षेसाठी नियुक्ती केलेली असल्याची माहितीदेखील पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली आहे.


पालिका प्रशासन दारी-नगराध्यक्ष विनोद बोराडे
शहरातील गणेश भक्तांचे सार्वजनिक व घरगुती गणपती स्वतंत्र वाहनाने विसर्जनासाठी, घेऊन जाण्यासाठी, नगरपालिका प्रशासन प्रत्येकाच्या घरी जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली आहे. ते म्हणाले की मंगळवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून गणेश मूर्ती जमा करण्यासाठी स्वतंत्र 15 वाहने लावण्यात आली आहेत. या प्रत्येक वाहनावर ध्वनिक्षेपक लावलेला आहे. आपल्या घरासमोर वाहन आल्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे आपली श्रीगणेशाची मूर्ती दिल्यास, पुढील विसर्जनाची पूर्ण जबाबदारी पालिका प्रशासन व पालिका कर्मचारी घेणार आहेत. पाथरी रस्त्यावरील बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरातील विहिरीत सर्व गणेशमूर्तींचे परंपरेनुसार विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी पत्रकारांना दिली आहे.





Post a Comment

0 Comments