Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ पुणे विभागातील एक लाख ६३ हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूर





पुणे  ➡️ यंदा कमी झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास टाळले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच घट झाली आहे. पुणे विभागात रब्बीच्या पेरणीपासून सुमारे एक लाख ६३ हजार १८४ हेक्टर क्षेत्र दूर राहिले आहे. परिणामी, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.



१४ टक्के पेरण्या होणे बाकी

रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टरपैकी ९ लाख ८६ हजार ८२ हेक्टर म्हणजेच ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अजूनही विभागात जवळपास १४ टक्के पेरण्या होणे बाकी आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात सरासरी १० लाख ६१ हजार ११६ हेक्टर म्हणजेच ८६ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्या वेळीही रब्बीच्या पेरणीपासून सुमारे ८८ हजार १५० हेक्टर क्षेत्र दूर राहिले होते. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ज्वारीच्या पिकांच्या काढणीस लवकरच सुरुवात होणार आहे.



गहू पिकांवर खोड किडीचा प्रादुर्भाव

नगर जिल्ह्यात हंगामातील ज्वारी पीक कणसामध्ये दाणे भरण्याच्या, काढणीच्या अवस्थेत आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने गहू पिकास पोषक वातावरण आहे. गहू पिकांवर काही ठिकाणी अल्प प्रमाणात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. हरभरा पीक फुलोरा ते घाटे येण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.




एक लाख ६७ हजार ६५९ हेक्टरवर पेरणी

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टरपैकी एक लाख ६७ हजार ६५९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सद्यःस्थितीत ज्वारी पिके दाणे भरण्याच्या व काही ठिकाणी काढणीच्या टप्प्यात आहे. हरभरा पीक घाटे पक्वतेच्या अवस्थेत आहे. गहू पीक ओंब्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. मका, कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. जिराईत ज्वारी पिकांस पाण्याची आवश्यकता आहे. बागायत ज्वारी पिकांची वाढ जोमदार आहे. काही ठिकाणी ज्वारीवर अल्प प्रमाणात माव्याच्या प्रादुर्भावामुळे चिकटा पडला आहे. गहू पीक दाणे भरण्याच्या, हरभरा फुलोरा अवस्थेत आहे.






Post a Comment

0 Comments