Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  मणिपुर घटनेच्या विरोधात विविध संघटनांकडून भरपावसात ‘जनआक्रोश’ आंदोलन





परभणी ➡️ मणिपुर राज्यातील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध व समान नागरी कायदाच्या विरोधात आज गुरूवारी (दि.27) रोजी विविध लोकशाहीवादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत भरपावसात जनआक्रोश आंदोलन केले. (vnsnews24, feature ) 





संविधान बचाव समिती, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय आदिवासी पैंथर संघटना, व विविध लोकशाहीवादी संघटनेच्या वतीने आज भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. तसेच  समान नागरी कायद्याला तीव्र विरोध करीत मणिपुरच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.





जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या समाज माध्यमांवर समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विविध प्रकारे चर्चा होत आहे. त्यामधून समज-गैरसमज निर्माण होऊन विविध समाजामध्ये संभ्रमाची अवस्था आहे. भारतीय राज्यघटनेने आर्टिकल 14 प्रमाणे समानतेचा अधिकार सर्व समाजाला पुर्णपणे लागू केला असताना समान नागरी कायद्याचा अटापीटा का? सर्व धर्माच्या नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य भारतीय संविधानाने बहाल केले आहे. गेल्या 75 वर्षात समानता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य सर्व बाजूने देण्यात भारतीय संविधान हे यशस्वी झाले आहे. समान नागरी कायद्याच्या आड मुस्लिम व हिंदु यांच्यामध्ये दंगली घडवण्याचा व जातीय तेढ निर्माण करण्याचा हा नियोजनबध्द कट असा आरोपही केला आहे. त्यामुळे या कायद्याला सर्व लोकशाहीवादी जनतेचा तीव्र विरोध आहे.





गेल्या अडीच महिन्यापासून मणिपूरमध्ये मैथीली व कुकी या आदिवासी समुहात भीषण अशी दंगल सुरु आहे. या दंगलीत शेकडो निरापराधाचे जीव गेले आहेत. हजारो घरांची राखरांगोळी झालेली आहे, हजारो आदिवासी बांधव बेपत्ता आहेत, आदिवासी समुहातील दोन महिलांना निर्वस्त्र करुन धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला.  





या प्रकरणात त्वरीत राष्ट्रपती शासन मणिपूरमध्ये लावण्यात यावे, या घटनेचे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मणिपूर दंगलीत निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिशामार्फत चौकशी करण्यात यावी. या महत्वपुर्ण मागण्यांसाठी आज गुरूवारी विविध लोकशाहीवादी संघटनांच्या वतीने तिव्र निषेध जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.



यावेळी संविधान बचाव समितीचे अध्यक्ष विजय वाकोडे, सदस्या अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर, कार्याध्यक्ष मौलाना रफिउद्दीन अशरफी, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक लखन चव्हाण, भारतीय आदिवासी पँथरचे अध्यक्ष प्रशांत बोडखे, भिम टायगर संघटनेचे अर्जुन पंडीत, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, रिपब्लीकन सेनेचे विभागीय अध्यक्ष आशिष वाकोडे, बहुजन समाज पार्टीचे राहुल घनसावंत यांच्या पदाधिकारी व महिला-पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.




Post a Comment

0 Comments