Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ नाव्हा ता.पालम येथे शासन आपल्या दारी आणि व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन




परभणी ➡️ तहसील कार्यालय पालम आणि पंचायत समिती पालम तसेच ग्रामपंचायत कार्यालय नाव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी पालम तालुक्यातील नाव्हा ग्रामपंचायती मध्ये शासन आपल्या दारी तसेच व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (vnsnews24, feature ) 





मागील काही महिन्यांपासून नाव्हा गाव आणि पंचक्रोशी मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्याकरीता नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांना समुपदेशन करण्यासाठी आणि विविध विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ व प्रचार प्रसिद्धीकरिता परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी वरील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्या बाबतच्या सूचना  संबंधित विभागांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.




सदर कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, उपविभागीय अधिकारी हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास मोझरी अमरावती येथील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रबोधनकार रविदादा मानव यांचे व्याख्यान तर इंजिनीयर भाऊसाहेब  थुटे यांच्या चमुचे व्यसनमुक्ती वर आधारित खंजिरी भजन आयोजित करण्यात आले आहे. 




त्याच बरोबर नांदेड येथील मानसोपचार तज्ञ डॉ डी बी जोशी व डॉ शिवाजी शिंदे हे देखील या कार्यक्रमात तरुणांना व्यसनांचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.




या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना देखील लाभ देण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक हे देखील उपस्थित राहणार आहेत. तेव्हा  अधिकाधिक नागरिकांनी या मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन पालम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदयसिंह शिसोदे यांनी केले आहे.






Post a Comment

0 Comments