Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करा - संघर्ष समितीची मागणी





परभणी ➡️ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने आज सोमवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आठ दिवसात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची चेतावनी देण्यात आली.(vnsnews24, feature ) 




परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे यासाठी सातत्याने आंदोलने करण्यात आली. मराठवाड्याचा मागासपणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाने केलेल्या ठरावाला अनुसरून मागील सरकारने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि 432 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. महाविद्यालयासाठी लागणारी 50 एकर जागा तात्काळ उपलब्ध करून दिली आणि आवश्यक त्या प्राध्यापकांच्या नियुक्ती देखील केल्या. 





सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर भारतीय वैद्यकीय आयर्विज्ञान (‘आयएमसी’)नवी दिल्ली यांच्याकडे  मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला. ‘आयएमसी’ने दोन सदस्य समिती परभणीला पाठवून पायाभूत सुविधांची पडताळणी केली. स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे समितीने विरोधात अहवाल दिला. त्यामुळे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया रखडली गेली. त्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रथम अपील दाखल करण्यात आले. परंतु ‘आयएमसी’ने ते फेटाळले त्यानंतर शासनाच्या वतीने दुसरे अपील दाखल करण्यात आले. त्या अपिलावर 15 जून 2023 रोजी दिल्लीत सुनावणी झाली असून निकाल प्रलंबित आहे. 



परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. परंतु काही प्रशासकीय अधिकारी शासनाच्या धोरणाला हरताळ फासत असून त्यांंच्या बेजबाबदारपणामुळे शासकीय महाविद्यालयाची 2023-24 ची प्रवेश प्रक्रिया रखडल्या जाऊ नये यासाठी परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. 


येत्या आठ दिवसात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असून आठ दिवसाच्या कालावधीनंतर येथे रेल्वे रोको करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले. या आंदोलनात पदाधिकार्‍यांबरोबरच शेकडो नागरिक उपस्थित होते. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.



या धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, अ‍ॅड. अशोक सोनी, अ‍ॅड.पवन निकम, अमृतराव शिंदे, काँ.कीर्तीकुमार बुरांडे, गणपत भिसे, संतोष देशमुख, सोनाली देशमुख, प्रभाकरराव लंगोटे, राजेश बालटकर, अरुण पवार, विश्वंभर गावंडे, मनोज राऊत, विकास लंगोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 







Post a Comment

0 Comments