Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | gov | parbhani | पीक विमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - कृषि मंत्री अब्दुल सत्तार




परभणी ➡️ यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील 31 मंडळांमधील खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. या मंडळांमधील प्रधानमंत्री पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. त्यामुळे एकही शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. 




जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी सत्तार बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रल्हाद नेमाडे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. 





खरीप पेरणी झाल्यानंतर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाने मोठी उघडीप दिली होती. नंतर अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रधानमंत्री कृषि विमा योजनेंतर्गंत या दोन्ही पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून पीक विमा कंपन्यांना घालून दिलेल्या अटी शर्थीनुसार विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. यापूर्वीच जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील आठ मंडळातील 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये जमा झाले असल्याचे सत्तार यांनी सांगितले. 




पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी राज्य शासनासोबतच जिल्हाधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी योग्य समन्वय ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सोबतच उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी. त्यांची बँक खात्याशी 100 टक्के आधार जोडणी (ईकेवायसी) व्हावी, त्यासाठी येणाऱ्या अडचणीही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. तसेच उर्वरित शेतकऱ्यांची आधार जोडणी करण्यासाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.





मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांबाबत अत्यंत दक्ष असून, महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिक विम्यासह इ-पिक पाहणी करावी. त्यासाठी कृषि सहायक आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून याबाबतची माहिती शेतकऱ्यांकडून भरून घ्यावी. तसेच या बाबीकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश सत्तार यांनी दिले. 





महात्मा जेातिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गंत प्रोत्साहनपर लाभ योजनेचाही सत्तार यांनी आढावा घेतला. नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे प्रभारी जिल्हा उपनिबंधक भोसले यांनी याबाबतची कृषिमंत्र्यांना माहिती दिली. 





तसेच गोगलगायींमुळे झालेली नुकसानभरपाई, किसान क्रेडीट कार्ड योजना, पिक विमा कंपनीच्या प्रतिधिनींशीही यावेळी चर्चा करत जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, यावर विशेष लक्ष देण्याचे आदेश त्यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यात लम्पी आजारासंदर्भात केलेली कार्यवाही, पशुपालकाची मृत जनावरे, झालेले नुकसान आणि शासनाकडून दिलेली भरपाई, लसीकरण, जनावरांची नोंदणी याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती जाणून घेतली.vnsnews-24 | gov | parbhani




वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथील जागेत अत्याधुनिक जिल्हा क्रीडा संकुल उभारणी आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जागेसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आग्रही असल्याचे सांगून विद्यापीठ प्रशासनाने यामध्ये लक्ष घालण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या. स्थानिक पातळीवरील हवामानातील बदल, पर्जन्यमानाचे अचूक मापन व्हावे, त्याचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी राज्यात 10 हजार पर्जन्यमापक केंद्र सुरु करण्यात येणार आहेत, स्थानिक पातळीवर हे यंत्र बसविण्याबाबतही सत्तार यांनी आढावा घेतला.




तत्पूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील महिला शेतकरी श्रीमती मीना भगवान सानप यांच्या शेतातील तूर आणि सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी केली. तसेच मग्रारोहयो योजने अंतर्गत जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील महादेव नागोराव सानप यांच्या पेरू आणि आशामती महादेव सानप यांच्या सिताफळ या लागवड केलेल्या फळबागेची देखील कृषि मंत्री सत्तार यांनी पाहणी केली. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गट विकास अधिकारी मोरे, तालुका कृषि अधिकारी शंकर काळे उपस्थित होते.




जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विषयांवरील आढावा बैठकीनंतर कृषि मंत्री सत्तार यांनी परभणी तालुक्यातील असोला येथील जावळे यांच्या खजूर शेतीची पाहणी केली. या नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांनी आता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, असे मत व्यक्त करीत कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.







Post a Comment

0 Comments