Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | parbhani | शिक्षक विनोद शेंडगे यांच्या मराठवाडा सायकल परिक्रमेला प्रारंभ





परभणी ➡️ मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त शिक्षक विनोद शेंडगे यांनी वाचन चळवळ वाढीसाठी आयोजित केलेल्या मराठवाडा सायकल परिक्रमेला आज दि.28 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. शहरातील बी.रघुनाथ सभागृहापासून अमरावतीचे शिक्षण उपसंचालक संजय ससाणे, साहित्यिक बा.बा. कोटंबे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या परिक्रमेला प्रारंभ करण्यात आला.



यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण उपसंचालक ससाणे यांनी सांगितले की, वाचन हे मनाचे अन्न आहे.वाचनामुळे मन आनंदी व प्रसन्न राहते. बरीच माणसे वाचन करतात. त्या वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कृतीत आणत नाहीत. वाचनाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली तर ते अधिक परिणामकारक ठरेल. साहित्यीक कोटंबे यांनी वाचनाचे महत्व विशद केले. आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या युगात कुणीच वाचन करत नसल्याची ओरड आपण करतो. परंतू वाचन चळवळ खरोखर रुजविण्यासाठी कुणीही पुढे आल्याचे दिसत नाही. अशा स्थितीत शिक्षक शेंडगे हे पदरमोड करुन सायकलवर संपूर्ण मराठवाडा फिरुन राबवित असलेल्या वाचन चळवळ जागृती मोहिमेचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. 




तसेच या मोहिमेचे जागोजागी अगत्यपूर्ण स्वागत होईल यासाठी सहकार्य करण्याबाबत  मराठवाड्यातील साहित्यीक मित्रांना संपर्क साधून आवाहन करणार असल्याचे सांगितले. ग्रंथपाल कदम यांनी वाचन संस्कृती लोप पावत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली. वाचकांना पुस्तकांकडे वळविण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करुन पाश्चात्य राष्ट्रांमध्ये वाचकांच्या मागणीनुसार ग्रंथालयामध्ये पुस्तके आणली जातात, असेही ते म्हणाले. वाचन संस्कृती जतन करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 





💠 अक्षर आनंद वाचन चळवळ जनजागृतीसाठी मराठवाडा सायकल परिक्रमा


उज्वल भविष्यासाठीची वाचन ही गुंतवणूक आहे. एका आयुष्यात अनेक जीवन जगण्यासाठी आर्थिक स्वावलंबनासोबतच मानसिक, वैचारिक स्वावलंबन येण्यासाठी वाचनाची गरज आहे .वाचन संस्कृती समाजात वाढावी. बालकांंवर वाचनाचे संस्कार व्हावेत. यासाठी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र कार्य करते.  वाचन चळवळीच्या जनजागृतीसाठी संपूर्ण मराठवाडा सायकल परिक्रमा विनोद शेंडगे करत आहेत. 






प्रवासाचा मार्ग परभणी, त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, नांदेड , लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, अंबड, जालना, औरंगाबाद असा सायकल प्रवास करत आहेत. प्रवासात वाचनालय, सायकल प्रेमी ,वाचक प्रेमी, साहित्यिक यांच्याशी संवाद साधत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आठही जिल्ह्यातून मनासाठी पुस्तक वाचन तर आरोग्यासाठी सायकल हा संदेश लोकांना ते देत आहेत. वाचन वाढविण्यासाठी विविध कृती कार्यक्रम अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र राबवत असते. दिनांक 28 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर असा हा प्रवास आहे.





याप्रसंगी मानवतचे केंद्रप्रमुख शिरीष लोहट, भोसा येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक यू.एस.आर्विकर, जिल्हा सायकलिंग संघटनेचे पदाधिकारी शंकर अण्णा फुटके, दीपक शिंदे, महसूल विभागातील मंडळ अधिकारी अंगद पागोटे, मारुती डोईफोडे, हनुमान व्हरगुळे, प्रा.सखाराम कदम, एकनाथ गायकवाड, सुभाष बारवकर, निवृत्ती गायकवाड, जगन्नाथ घोडके, निवृत्ती काळदाते, रविकांत झटे, पत्रकार बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते. 







Post a Comment

0 Comments