Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

vnsnews-24 | feature | parbhani | एचएआरसी तर्फे दैठणा येथे मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम निमित्त विशेष कार्यक्रम




परभणी ➡️ कोणत्याही धार्मिक कार्य आहे म्हणून पाळी लांबविण्याच्या गोळ्या खाणार नाही एचएआरसी तर्फे दैठणा येथे मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.






मी अशी शपथ घेते की 'येत्या काही दिवसांत की गणपती उत्सव,  महालक्ष्मी पूजन असो की इतर कोणतेही सण किंवा धार्मिक यात्रा मुळे कधीच मासिक पाळी लांबविण्याच्या गोळ्या खाणार नाही. आज मी एक मुलगी म्हणून अशी शपथ घेते की उद्या एक सून म्हणून त्याच प्रमाणे परवा एक आजी म्हणून सुनेला तसेच नातीला घरात धार्मिक कार्य आहे. म्हणून पाळी लांबविण्याच्या आग्रह करणार नाही.






मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचा मी एक स्त्री म्हणून तिचा पूर्णपणे सन्मान करेन. तसेच माझ्याप्रमाणे इतर स्त्रियांना पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल मी जागरूक राहून त्यांना नेहमी योग्य मार्ग दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मला माझ्या स्त्रीत्वाचा सदैव अभिमान आहे आणि मी समाजातील प्रत्येक स्त्रीला एक स्त्री म्हणून सन्मानाने वागनुक देईन. अशी शपथ एचएआरसी संस्थे तर्फे जिल्हा परिषद शाळा दैठणा येथे आयोजित 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळेत डॉ. आशा चांडक यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना दिली. 



या निमित्ताने त्या पुढे म्हणाल्या की "दुर्दैवाने आजही अनेक सुशिक्षित स्त्रिया पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतात ज्यामुळे स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवून टाकते आणि त्याचे मासिक पाळी व स्त्री प्रजनन संस्थेवर तसेच रजोनिवृत्ती वेळी देखील दुष्परिणाम होतात. आज घरात कोणतेही धार्मिक कार्य असो स्त्रिया  'पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेऊन शरीरावर भडिमार करतात. म्हणूनच माझ्या ताई, आक्का, मावशी, काकू यांना विनंती की विचार करा. पाळी ही आपल्यास निसर्गाने, देवाने, परमेश्वराने दिली आहे त्यामुळे तिचा स्वीकार करा उलट त्या अशा आनंदाच्या सणात लांबवू नका. 




होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज परभणी या संस्थेतर्फे दि 29 ऑगस्ट सोमवार रोजी जिल्हा परिषद प्रशाला दैठणा ,ता जि परभणी येथे मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या शाळेतील इय्यता 8 वी ते 10 वी तील जवळपास 126 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती. 

 



या कार्यक्रमात डॉ. आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. 



या समुपदेशन सत्रात 126 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून सॅनिटरी पॅड व मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. तसेच जिल्हा परिषद प्रश्नाला प्रशाला दैठणा ,ता जि परभणी येथील मुलींसाठी 'मेन्स्ट्रुपेडिया' या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. 



येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले. 




मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना:  अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका  ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले. एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले.



प्रास्ताविक डॉ. पवन चांडक यांनी केले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेतेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ. आशा चांडक,  सरपंच  कच्छवे, सुधीर सोनूनकर यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, मुख्याध्यापक एस. एस. दीक्षित,  एस.एम. संघई, संगीता भिसे,  एस.सी.पत्तेवार यांची उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments