Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

बाल विवाह लावल्यास संबंधितांवर कारवाई;  अक्षय्य तृतीयाच्या दिवशी बाल विवाह करु नये  - जिल्हाधिकारी आंचल गोयल 




परभणी ➡️ अक्षय तृतीया दि. 3 मे 2022 रोजी आहे. या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह आयोजित केले जातात. बाल विवाह लावल्यास संबंधित लग्न लावणारे धार्मिक गुरु, लग्नातील वऱ्हाडी, आचारी, बँडवाले, मंगल कार्यालयाचे मालक, व्यवस्थापक, मंडपवाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. हा गुन्हा दाखल झाल्यास या सर्वांवर सश्रम कारावासाची व द्रव्य दंडाची शिक्षा होवू शकते याची जाणीवही करुन देण्यात येत आहे. 





बाल विवाह झाल्यास या बालिकेची शारिरीक व मानसिक वाढ झालेली नसल्याने तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ती गरोदर राहिल्यास कमी वजनाचे बालक जन्माला येणे, बालमृत्यू होणे, माता मृत्यू होणे इत्यादी समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील रहिवाशांनी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी व इतर काळात बाल विवाह करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.





जिल्हाधिकारी कार्यालयात  बालविवाह प्रतिबंध संबंधित बैठक घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.  या वर्षात अक्षय तृतीया दि. 3 मे 2022 रोजी आहे.  त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 हा संपुर्ण राज्यात लागु करण्यात आला आहे. 





त्यानूसार बालविवाह करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणात बाल विवाह होतात तसेच परभणी जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये बाल विवाहात प्रथम क्रमांकावर असून त्यांचे प्रमाण 48 टक्के आहे. जिल्ह्यातील बाल विवाहाचे प्रमाण बघुन जिल्ह्यामध्ये बाल विवाह प्रतिबंधाचे काम जिल्हा प्रशासनाकडून यापुर्वीच सुरु झालेले आहे. परंतू अक्षय्य तृतीयाला मोठ्या प्रमाणात बाल विवाह होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दि.25 एप्रिल 2022 रोजी संबंधित विभागाची बैठक घेवून मार्गदर्शन केले. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



 




Post a Comment

0 Comments