Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

पहिल्याच महिन्यांत ठाणे वाहतूक पोलिसांनी केली तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाची वसूली





ठाणे
➡️ सुरक्षेच्या कारणांमुळे वाहनांच्या काचांवर काळ्या रंगाची फिल्म लावण्यास बंदी घातलेली आहे. तरीही त्याचे अनेकांकडून सरास उल्लंघन केले जाते. अशा 400 वाहन चालकांच्या विरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई  केली आहे. तर 
बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल 77 मद्यपी वाहनचालक आणि 35 सहप्रवाशांवर कारवाई केली. तसेच ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. 

आज एका दिवसात तब्बल 400 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासोबतच काचांवरील काळी फिल्म पोलिसांनी काढली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. त्यानुसार गुरूवारपासून ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी 400 वाहन चालकांवर कारवाई झाली आहे. त्यात सर्वाधिक ४८ वाहने कापूरबावडीच्या हद्दित आढळली आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच सात वाहनांवर अंबरनाथ येथे कारवाई झाली. ठाणे नगर (26), कोपरी (16), नौपाडा (19), वागळे (20), कासारवडवली (37), राबोडी (19), कळवा (28), मुंब्रा (15), भिवंडी (08), नारपोली (34), कोनगाव (16), कल्याण (21), डोंबिवली (20), कोळशेवाडी (29), विठ्ठलवाडी (10), उल्हासनगर (27) आणि अंबरनाथ (07) या विभागातही कारवाई झाली आहे.



मद्यपी वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बुधवारी रात्री अशाच कारवाईमध्ये तब्बल 77 मद्यपी वाहनचालक आणि 35 सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. रस्त्यांवर होणारे बहुसंख्य अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस वाहन चालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करतात. मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 अन्वये मद्यपी वाहन चालक आणि कलम 188 अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांसह सहप्रवाशांवरही कारवाई केली जात आहे. बुधवारी रात्री वाहतूक शाखेच्या 18 विभागांतर्गत विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात 77 मद्यपी वाहनचालकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासोबतच्या 35 सहप्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. कापूरबावडी विभागाअंतर्गत सर्वाधिक  16
प्रवासी आणि 08 सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यां वाहनचालकांच्या विरोधात ई चलान पद्धतीने ठोठावलेल्या दंडाच्या वसूलीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या 96 हजार 82 प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे. वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढावी यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ई चलानच्या दंड वसूलीसाठी 01 डिसेंबर, 2020 पासून धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत महिन्याभरात 03 कोटी 23 लाख 94 हजार 450 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यात कार्डच्या माध्यमातून 39 हजार 168 प्रकरणांमध्ये 01 कोटी 52 लाख रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. तर 56 हजार 916 वाहनचालकांनी रोखीने 01 कोटी 71 लाख रुपयांचा भरणा केला आहे. या मोहिमेअंतर्गत होणारी कारवाई यापुढेही सुरू राहणार असून वाहन चालकांनी आपापल्या दंडाची थकीत रक्कम भरावी असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 विभाग कार्यरत आहे. यापैकी नारपोली विभागाने सर्वाधिक 40 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल कल्याण (29 लाख 15 हजार) उल्हासनगर (27 लाख 59 हजार), कळवा (26 लाख 65 हजार) या विभागाचा क्रमांक लागतो. आपल्या वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली आहे. ती भऱण्यासाठी 04 वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहनचालकांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
.



Post a Comment

0 Comments