Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करा : कृषीमंत्री दादा भुसे





हिंगोली
➡️ सध्या हिंगोली व परभणी जिल्ह्यात दररोजच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असुन ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडत आहेत. अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तेथील पिकांचे जलदगतीने पंचनामे करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त करुन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, असे आदेश कृषि मंत्री दादा भुसे यांनी दिले. 
 
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार, हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषि मंत्री श्री. भुसे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सगळीकडेच अतिवृष्टीने पीक नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीची माहिती एकत्रित करुन मंत्रीमंडळ बैठकीत ठेवून शेतकरी बांधवाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच केंद्राकडे देखील याबाबत मदत करण्यासाठी विनंती करण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय पथकास पाहणी दौ-याची विनंती करण्यात येणार असल्याचे असल्याचेही श्री. भुसे यावेळी म्हणाले. 

परभणीचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती तसेच विकेल ते पिकेल, पोकरा यासह इतर कृषी योजनांच्या जिल्ह्यातील अमंलबजावणीबाबत माहिती दिली. यामध्ये माहे जून ते ऑगस्ट मध्येअतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानीचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असून 27 हजार 412 हेक्टर बाधीत क्षेत्र आहे. जिल्ह्यात सन 2020-21 खरीप हंगामामध्ये एकूण प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र 05 लाख 23 हजार 809 हेक्टर इतके आहे. तसेच राष्ट्रीय बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ग्रामीण बँकांनी मिळून दि. 26 सप्टेंबर 2020 अखेर खरीप कर्ज एकूण रु. 710 कोटी 83 लक्ष वाटप केले आहे. महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 01 लाख 71 हजार 166 शेतकऱ्यांना 1069 कोटी रु. कर्ज वाटप करण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील एकूण 275 गावाची निवड करण्यात आली असून 4 हजार 954 शेतकरी लाभार्थ्यांना 12 कोटी 79 लक्ष रुपये एवढे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.


विकेल ते पिकेल धोरणातंर्गत उपप्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART), नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA), केंद्र पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्याची योजना (FPO), राज्य पुरस्कृत गट शेती योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास, भाऊसाहेब पांडुरंग फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना इत्यादी योजनातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. पंतप्रधान पिक विमा योजना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 07 लाख 129अर्ज आले असून त्यामधून 3 लाख 76 हजार 81 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये समाज माध्यमांचा वापर करुन शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्यासाठी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उप्तादक कंपनी व ग्राहक यांच्या व्हॉटस् अप ग्रुप तयार करुन भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आलेल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संतोष आळसे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपविभागीय कृषि अधिकारी, तालूका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments