Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  आषाढी एकादशी निमित्त विश्‍व हिंदू परिषदेतर्फे गोपाळ दिंडी






परभणी ➡️  टाळ आणि मृदुंगाच्या तालावर... माऊली, माऊली... अन् विठ्ठल नामाचा जयघोष करीत निघालेल्या गोपाळ दिंडीने गुरुवारी (दि.29) परभणी शहर दुमदुमली.. विश्‍व हिंदू परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरात आषाढी एकादशी निमित्ताने गोपाळ दिंडी आयोजित करण्यात आली. (vnsnews24, feature ) 




आज गुरुवारी सकाळी या दिंडी निमित्ताने माळी गल्लीतील मंदिरासमोर बाळ-गोपाळांनी गर्दी सुरु केली. त्यामुळे सकाळी 7.30 वाजताच माळी गल्लीतील चौक या बाळ-गोपाळांच्या अभूतपूर्व उत्साहाने, जल्लोषाने अक्षरशः फुललेला होता. वारकरी वेशभूषेतील मुलांच्या, नऊवार नेसलेल्या मुलींच्या तसेच विठ्ठल-रुक्मिणीसह अन्य संत-महंतांच्या वेशभूषेतील बाळ-गोपाळांनी या सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.




माळी गल्लीतील हनुमान मंदिरात सर्वप्रथम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्याहस्ते सपत्नीक आरती करण्यात आली. त्या पाठोपाठ पालखीतील श्री विठ्ठलरायाच्या मूर्तीसह ज्ञानेश्‍वरीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी विठ्ठल नामाचा एकच गजर झाला. विश्‍व हिंदू परिषदेचे क्षेत्रिय सेवा प्रमुख अनंत पांडे, नुतन विद्या समितीचे सचिव संतोष धारासुरकर, विश्‍व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री शिवप्रसाद कोरे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र  शहाणे, कार्याध्यक्ष प्रल्हादर कानडे, शहराध्यक्ष मनोज काबरा, जिल्हा सहमंत्री राजकुमार भामरे, सारंग स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत क्षीरसागर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संजयराव शेळके,  मोहन कुलकर्णी, माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रितेश जैन, माजी सभापती सचिन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या दिंडीत मराठवाडा हायस्कूल, सारंग स्वामी विद्यालय, अरविंदो अक्षरज्योती शहरातील या नामवंत शाळेतील तीन हजारांवर विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून टाळ-मृदुंगासह तर मुली देखील तुळशी वृंदावन सहभागी झाल्या होत्या. काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा साकारली होती. त्यात विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रोहिदास वगैरे संत-महंतांसह देव-देवतांचीही वेशभूषा साकारण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या तालासह ढोल-ताशांच्या गजरात तर लेझीमसह सुंदर अशा कवायतींची प्रात्यक्षिकेही प्रमुख चौकांसह रस्त्यांवर साकारण्यात आली. भगवे झेंडे घेवून काही विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य करीत लक्ष वेधून घेतले. नारायण चाळ, स्टेशन रोड, अष्टभूजा चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी पावली व विठू नामाच्या गजरात रिंगण सोहळा संपन्न झाला. अनेक ठिकाणी नागरिकांनी दिंडीचे पुजन केले. विशेषतः वासवी क्लब, विनीता क्लब, गुजरी बाजार मंडळ, रामदेवबाबा मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ, भाजप अशा विविध संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना केळी, राजगिरा लाडू, चिवडा व पेन वाटप करण्यात आले.

 



या दिंडीचा समारोप विद्यानगर येथील माऊली मंदिरात झाला. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुनील रामपूरकर, शहर मंत्री अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे, गणेश  काळबांडे, मनीष देशपांडे, शामसुंदर शहाणे, श्यामसुंदर कुलकर्णी, बाळासाहेब रणेर, विनोद लोलगे, विश्‍वास दिवाळकर आदींनी पुढाकार घेतला. तसेच मराठवाडा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक शिवाजी आरळकर, सूर्यकांत पाटील, अरविंद अक्षर ज्योती शाळेच्या प्रमुख शशी अय्यर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.








Post a Comment

0 Comments