Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

VNS-PBN-SAT/  पदवीसोबत कौशल्य संपादन ही काळाची गरज! - डॉ.डी.एम.खंदारे




नांदेड ➡️ 'उच्च शिक्षण ही घेणे ही आयुष्याला अर्थ देणारी गोष्ट आहे,त्यातही ते शिक्षण पूर्ण करुन पदवी प्राप्त करणे हे निश्चितच महत्त्वपूर्ण यश आहे; परंतु आजच्या आव्हानात्मक काळात नोकरी आणि व्यवसायासाठी केवळ पदवी पुरेशी नसून त्यासोबतच आपल्या क्षमतांना आविष्कृत करणारे कौशल्य संपादन करणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे,' असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.डी.एम.खंदारे यांनी केले.ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या  परीक्षेत यशवंत महाविद्यालयातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी वितरण समारंभात बोलत होते.  (vnsnews-24, feature, nanded )




कार्यक्रमाच्या प्रारंभी दीक्षांत मिरवणूक मुख्य कार्यालयापासून ते पदवी वितरण स्थळापर्यंत काढण्यात आली त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.





या पदवी वितरण समारंभात डॉ. खंदारे पुढे म्हणाले की, 'नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रातील स्पर्धा अतिशय तीव्र झाल्याने तरुण पिढी काहीशी निराश झालेली आढळते. आपल्या हाती पदवी असून देखील आपल्याला नोकरी,व्यवसायात यश मिळत नाही, अशी त्यांची सर्वसाधारण तक्रार असते. परंतु केवळ पदवीच्या बळावर नोकरी मिळण्याचा काळ आता राहिलेला नाही; पदवी महत्त्वाची आहेच; मात्र त्याबरोबरंच बाजारा(Job Market)साठी गरजेच्या असलेल्या वेगवेगळ्या अंगभूत कौशल्यांचे संपादन त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते आहे. हे लक्षात घेऊन तरुण पिढीने पदवी सोबतच कौशल्य संपादनातही पुढाकार घेतला पाहिजे,' असे आवाहन त्यांनी केले. 





अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर म्हणाले की, 'प्राचीन काळापासून आपल्या देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी अनेक विद्यापीठे होऊन गेली आहेत. यामुळे स्वाभाविकच भारतीय विद्यार्थ्यांकडे जगाचे लक्ष लागलेले असते. हे लक्षात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांनी अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार असून या बदलांसोबत समायोजन साधण्याची तयारी तरुण पिढीने ठेवली पाहिजे. यासोबतच आता आपण पदवीधर झालो म्हणजे ज्या कुटुंबात, समाजात आणि देशात आपला जन्म झाला आहे, त्यांचे पांग फेडण्यासाठी देखील आपण योगदान द्यायला हवे!' अशी अपेक्षा त्यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकडून केली. 


प्रस्तुत पदवी वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे यांनी केले तर अहवाल वाचन सह केंद्रप्रमुख डॉ.बी.आर.भोसले यांनी केले. यावेळी परीक्षा केंद्र प्रमुख डॉ.आर.एस.सोनवणे यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.विश्वाधार  देशमुख यांनी केले. 





महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या सोहळ्यात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले. डॉ. शिवदास शिंदे आणि प्रा.संगीता चाटी यांच्यासह संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सुरुवात तर राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली. 



अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.पद्माराणी राव, उर्दू विभागाच्या प्रमुख डॉ.एस.एम. दुर्राणी, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.व्ही.सी. बोरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री.गजानन पाटील,श्री. कालिदास बिरादार यांच्यासह अनेक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी यांची या सोहळ्याला उपस्थिती होती.






Post a Comment

0 Comments